मी राणीबाग बोलतेय!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

मी राणीबाग, तुमची १५६ वर्षांची खापरपणजी! शालेय, शैक्षणिक, कौटुंबिक सहलीत आपली भेट झाली आहे. परंतु, ही भेट वरचेवर होत राहावी, म्हणून हा लेखनप्रपंच.

तुम्हाला आधी माझी थोडी सविस्तर ओळख करून देते. मी मुंबईतली सर्वात मोठी बाग. आजचा भायखळा परिसर जेव्हा शिवडी परिसर म्हणून ओळखला जात होता, त्या काळात ब्रिटीशांनी `व्हिक्टोरिया गार्डन्स’ या नावाने ५३ एकर परिसरात माझी निर्मिती केली. कालांतराने स्वातंत्र्य मिळाल्यावर आता `वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालय’ या नावाने मला गौरविण्यात आले आहे. सुरुवातीला इथे फक्त पाना-फुलांनी, वनस्पतींनी नटलेली बाग होती. त्या नंतर इथल्या विस्तीर्ण परिसरात लोकांच्या मनोरंजनासाठी वन्य प्राणी आणण्यात आले. माझी लोकप्रियता वाढली. शहरात वसलेले जंगल पाहण्यासाठी तुम्ही इथे येऊ लागलात आणि माझ्याबरोबर घालवलेले क्षण मनात जतन करून ठेवू लागलात. तुमचे बालपण मी पाहिले आहे आणि आता माझा मेकओव्हर तुम्ही बघणार आहात.

byculla-zoo

मेकओव्हर…! हो हो, मेकओव्हर. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या आधुनिकीकरण प्रकल्पामुळे काही काळातच तुमच्या आवडत्या राणीबागेचा पुर्णपणे कायापालट होणार आहे. राणीबाग हे केवळ आता उद्यान व प्राणीसंग्रहालय राहिलेले नसून ते निसर्ग शिक्षण,संवर्धन व संशोधन केंद्र झाले आहे. नाही कळले? थांबा सविस्तर सांगते.

पूर्वी प्राणीसंग्रहालयांकडे केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणून बघितले जात असे. लोक येत, प्राणी बघत, झाडांखाली विसावा घेत, सहलीचा आनंद घेत आणि निघून जात. मात्र १९९२ पासून केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर आपल्या देशातील सर्व प्राणीसंग्रहालयांसाठी राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय पॉलिसी तयार करण्यात आली. त्या पॉलिसीचे मुख्य दोन हेतू :
१. नष्ट होत असलेल्या प्राण्यांच्या जातींचे जतन, संवर्धन व संरक्षण करणे आणि त्या प्राण्यांची संख्या वाढल्यावर शक्य झाल्यास त्यांना जंगलात पुनर्प्रस्थापित करणे .
२. शालेय विद्यार्थी, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसाधारण अभ्यागत यांच्यामनामध्ये निसर्ग, पर्यावरण व वन्यजीवन संबंधाने योग्य आवड व जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करणारे निसर्ग शिक्षण केन्द्र म्हणून कार्य करणे.

पूर्वी प्राणीसंग्रहालयामध्ये ठेवण्यासाठी प्राण्यांना जंगलातून पकडून आणले जात असे. मात्र, राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय पॉलिसी मधिल मार्गदर्शक तत्वांनुसार योग्य ती कार्यवाही करून एका प्राणीसंग्रहालयातील अतिरिक्त प्राणी दुसऱ्या प्राणीसंग्रहालयात देवाण-घेवाण प्रक्रियेमार्फ़त प्राप्त केले जातात. बरेचसे शाकाहारी प्राणी, ज्यांचा पिंजऱ्यात जन्म होऊनही ते सहज जंगलात समरस होऊ शकतात, अशा प्राण्यांना जंगलात पुनप्र्रस्थापित केले जाऊ शकते, तर इतर मांसाहारी प्राणी, जे पिंजऱ्याला सरावले असल्यामुळे जंगलात टिकू शकत नाहीत, अशा प्राण्यांना प्राणीसंग्रहालयात संरक्षण दिले जाते.maxresdefault-1

इथे, म्हणजे राणीबागेत आल्यावर अनेकांच्या मनात प्राण्यांना कैदेत ठेवल्याबद्दल राग उत्पन्न होतो. प्राण्यांबद्दल सहानुभूती वाटू लागले. जी एका अर्थी योग्य आहे, परंतु प्राणीसंग्रहालयातले प्राणी कैदेत नसून, ते सुरक्षित असतात, ह्या बाबीकडे त्यांचे लक्ष वेधले जात नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे इथले प्राणी जंगलातून नाही, तर दुसऱ्या प्राणीसंग्रहालयातून आयात केलेले असतात. उदा. सध्याचे राणीबागेचे मुख्य आकर्षण असलेले पेंग्विन. ते आणण्याची चर्चा सुरू झाली आणि पूर्ण माहिती न मिळवता लोकांनी सर्वतोपरी टीकेची झोड उठवली बर्फाळ प्रदेशातले पेंग्विन दमट हवामानात कसा टिकाव धरतील, असा सर्वांना प्रश्न पडला होता. परंतु, हे पेंग्विन बर्फाळ प्रदेशातले नसून खुला समुद्र व खडकाळ जागी राहणारे आहेत.

राणीबागेत आणलेले हम्बोल्ट पेंग्विन हे कोअॅक्स अॅक्वेरियम, दक्षिण कोरिया येथून आणण्यात आले आहेत. तिथे त्यांचा जन्म झाला होता. ते शांत स्वभावाचे असून त्यांची वर्तणूक माणसाळलेली असते, त्यामुळे ते प्राणीसंग्रहालयात ठेवण्यासाठी योग्य असतात. हा सर्व पूर्वाभ्यास करून त्यांना राणीबागेत आणण्यात आले आहे. त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. त्यांना मानवेल अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांची फौज तैनात करण्यात आली. आणि म्हणून ते इथे छान रुळले आहेत. आता तर त्यांनी आपापसात जोड्या बनवल्या आहेत. लवकरच त्यांच्याकडून गूड न्यूज’ मिळण्याचीही आशा आहे. ह्यावरून स्पष्ट होते, की पेंग्विनसाठी इथे योग्य माहोल तयार झाला आहे.img_2221-edited-2

दुर्दैवाने अशा गोष्टी योग्य पद्धतीने प्रकाशझोतात न आणता, त्याचा अपप्रचार केला जातो. मात्र, पेंग्विनच्या पायगुणामुळे एकंदर परिस्थिती पालटतेय. दरदिवशी इथे १५ ते २०,००० लोक मला भेटायला येतात. सुटीच्या दिवशी हा आकडा ३०,००० च्या वर जातो. एवढ्या संख्येने लोक येऊनही इथल्या प्रसाधनगृहात आणि सबंध परिसरात कुठेही अस्वच्छता आढळत नाही, कारण आमचे स्वच्छतासेवक पूर्णवेळ इथे कार्यरत असतात. प्राण्यांच्या उपचारासाठी आणि दैनंदिन देखभालीसाठी इथे प्राण्यांचा दवाखाना आहे. पुरेसे डॉक्टर, सेवक आणि औषधांचा मुबलक साठा आहे. प्राण्यांची संख्या तूर्तास रोडावली आहे, पण मला सांगायला आनंद होतोय, की येत्या वर्षभरात १७ प्राण्यांच्या देशी-विदेशी प्रजाती आपण आयात करणार आहोत. प्राण्यांचे आवासस्थान तयार झाल्यावर `अॅनिमल कलेक्शन प्लॅन’नुसार आशियाई सिंह, बंगाल वाघ, तरस, कोल्हा, लांडगा, देशी अस्वल, गवा, बाराशिंगा, सांबर, काळवीट, निलगाय, छोट्या मांजरीच्या वर्गातील प्राणी, विविध पक्षी, पाणमांजर, एमू, पाणघोडा, जग्वार, झेब्रा हे प्राणी भविष्यात प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

पूर्वीचे पिंजरे अभ्यासपूर्वक बांधलेले नव्हते. पिंजऱ्यात प्राणी ठेवणे आणि चहुबाजूंनी लोकांना तो दिसणे, एवढाच विचार त्यामागे होता. त्यामुळे, प्राण्यांना अपेक्षित असलेली शांतता मिळत नसे. त्यांची चिडचिड होई, ते आजारी पडत, त्यांचे मानसिक संतुलन ढासळत असे. मात्र, नवीन पिंजरे तयार करताना प्राण्यांच्या सोयीचा पूर्णपणे विचार केला जाणार आहे. उदाहरणार्थ, वाघाला पाण्यात मनसोक्त डुंबायला आवडते, म्हणून त्याच्यासाठी दिलेल्या परिसरात अर्धा भाग पाणवठ्याचा, तर अर्धा भाग जमिनीचा ज्यामध्ये नैसर्गिक गुहा तसेच वाघाच्या नैसर्गिक अधिवासामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या वनस्पती इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव केला जाईल. तर, सिंहाला त्याच्या नैसर्गिक अधिवासानुसार खुरट्या वनस्पती, पाण्याचे वावडे असल्यामुळे, त्याच्यासाठी पिण्यापुरते पाणी आणि नैसर्गिक गुहा अशी नव्या पिंजऱ्यांची रचना असेल.

आधुनिक प्राणीसंग्रहालय कसे असावे, त्यासाठी कोणती मार्गदर्शक तत्त्वे असावीत याची आखणी राष्ट्रीय प्राणीसंग्रहालय पॉलिसीत केली आहे. त्यानुसार देशातील समस्त प्राणीसंग्रहालयांची आखणी केली जात आहे. त्यामुळे माझ्या रचनेतही बदल केले जात आहेत.maxresdefault

प्राणीसंग्रहालयांबरोबर गरज आहे, ती प्राणीसंग्रहालयाबाबत लोकांच्या मानसिकतेत बदल घडवण्याची. त्यासाठी आमचे शिक्षण आणि जनसंपर्क अधिकारी अनिल परांजपे शालेय शिक्षकांसाठी `झू अवेअरनेस प्रोग्राम’ राबवत आहेत. शिक्षक हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षकांमुळे हजारो मुलांपर्यंत माहिती पोहोचू शकते आणि मुलांमार्फत ती माहिती त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचू शकते. त्यादृष्टीने महापालिकेच्या शिक्षकांपासूनसदर कार्यक्रमांना सुरुवात केली. प्रत्येक दिवशीच्या कार्यक्रमामध्ये २४ शिक्षकांचा गट सहभागी करण्यात आला.त्यांना प्राणीसंग्रहालयांच्या आधुनिक संकल्पनेबाबत प्रास्ताविक दिले, प्राणीसंग्रहालयाची माहिती दिली, महत्त्व पटवले. त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता शैक्षणिक उपक्रम म्हणून पाहण्याची दृष्टी दिली. प्रत्यक्ष प्राणीसंग्रहालय मार्गदर्शन सहली आयोजित करून प्राण्यांची-पक्ष्यांची सविस्तर माहिती दिली. शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. केवळ तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच नाही, तर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सहल म्हणून राणीबागेत आणण्याचे आवाहन केले. शिक्षकांसाठी हे एकदिवसीय सत्र दर मंगळवारी आणि गुरुवारी राबवले जाते. आजवर २५०० शिक्षकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि आपला अभिप्राय, सूचनाही कळवल्या आहेत.img_2342

ह्याच शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग म्हणून वसुंधरा दिवस, वन्यजीव सप्ताह, जागतीक पर्यावरण दिन इत्यादी साजरे करण्यात येत असतात. ज्यासाठी प्रदर्शने, मार्गदर्शक सहली, तज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने, चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विद्याथ्र्यांनी त्यांचा आवडता प्राणी निवडावा, त्याच्या पिंजऱ्यासमोर जाऊन बसावे, त्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे सूक्ष्म निरीक्षण करावे आणि मग चित्र साकारावे, हा इथल्या चित्रकला स्पर्धेचा नियम असतो. विद्यार्थ्यांना प्राणीसंग्रहालयाबद्दल प्रेम निर्माण व्हावे, आपुलकी वाटावी, भूतदया वाटावी आणि आपणही निसर्गचक्राचा एक भाग आहोत, याची जाणीव व्हावी, हा ह्या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश असतो. यासर्व शैक्षणिक कार्यक्रमांचा भविष्यामध्ये विस्तार करण्यात येणार आहे.

ही सगळी माहिती निश्चितच तुमच्यासाठी नवीन असेल, हो ना? त्या माहितीत आणखी थोडी रोचक माहितीची भर घालते. लवकरच, इथल्या निसर्ग शिक्षण केन्द्रामध्ये एक वातानुकुलित सभागृह तयार होणार आहे. तिथे सर्व प्राणीप्रेमींना एका छताखाली `झू अवेअरनेस प्रोग्रामची’ माहिती स्लाईड शोजच्या माध्यमातून देता येईल. याशिवाय प्राणीसंग्रहालयाशी निगडित कार्यक्रमांचेही सादरीकरण करता येईल. त्या सभागृहाची बैठक क्षमता २०० जणांची असेल. सभागृहाचे काम सुरू झाले आहे, लवकरच त्याचे लोकार्पण केले जाईल.

ह्याबरोबरीने प्राणीसंग्रहालयाचे कायमस्वरूपी सुंदर प्रदर्शन उभारले जाणार आहे. त्यात जैवविविधतेची माहिती मिळेलच, शिवाय नष्ट होत चाललेल्या प्रजाती, नष्ट झालेल्या प्रजाती, मुंबईत आढळणारे वन्यजीवन इ. सचित्र माहिती मिळेल.
प्राणिविश्वात अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्यांची माहिती अतिशय रंजक आहे. परंतु आपण ती जाणून घेत नाही. निसर्गात प्रत्येक गोष्टीमागे कारण असते, ते कारण जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. जसे की, शाकाहारी प्राण्यांचे डोळे चेहऱ्याच्या बाजुला असतात तर मांसाहारी प्राण्यांचे डोळे समोरच्या बाजुला असतात. त्यामुळे मांसाहारी प्राण्यांना त्रिमीतीचे व अंतराचे ज्ञान शाकाहारी प्राण्यांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे होते. वाघाच्या अंगावर उभे पट्टे असतात, कारण वाघ मुख्यत्वे करून बांबूच्या वनात राहतात. निसर्गाने त्याला शिकार शोधार्थ पट्टे दिले आहेत. त्यामुळे बांबूच्या वनात पंधरा फुटावर असलेला वाघही आपल्या नजरेस पडत नाही. तर हरीणांना मातीसारखा, सुकलेल्या पानांसारखा रंग आहे. त्यामुळे ते आजुबाजुच्या निसर्गाशी एकरूप होतात. असे प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे.

गुगलवर प्राण्यांचे फोटो मिळतील, माहिती सापडेल, यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओही पाहता येतील, मात्र प्राणीसंग्रहालयात ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष पाहता येतात. जंगलात विविध पशु पक्षी असतात, मात्र ते आपल्याला हमखास दिसतीलच असे नाही, दिसले तरी फार वेळ त्यांचे निरिक्षण करणे शक्य होईलच असे नाही. लोक बऱ्याचदा व्याघ्रसफारीला जातात, पण वाघ न दिसल्याने निराश होतात. प्राणीसंग्रहालयात मात्र, हवा तेवढा वेळ तुम्ही वाघाला किंवा अन्य प्राण्याला-पक्ष्याला पाहू शकता, त्याच्या हालचाली, त्याची वैशिष्ट्ये, ऋतूमानानुसार होणारे बदल यांचे व्यवस्थित निरीक्षण करू शकता.

मात्र हा सर्व आनंद घेताना आपण स्वत:वर काही बंधने घालून घेतली पाहिजेत. प्राणीसंग्रहालयात आल्यावर प्रत्येकाला वाटते, वाघाने आपल्याला बघून डरकाळी फोडावी, पेंग्विनने आपल्या डोळ्यादेखत पाण्यात सूर मारावा, मगरीने हालचाल करून दाखवावी, गरुडाने गरुडझेप घेऊन दाखवावी, मात्र तसे घडले नाही, की तुम्ही नाराज होता. परंतु, विचार करा, इथे येणाऱ्या प्रत्येकाला वाघाची डरकाळी ऐकावी वाटत असेल, तर दिवसभरातून त्याला किती वेळा ओरडावे लागेल? म्हणून प्राण्यांना अशा हालचाली करण्यासाठी उद्युक्त करणे, वेगवेगळे आवाज करणे, दगड मारणे, खाऊ घालणे, खिजवणे अशी गैरकृत्ये करता कामा नये. त्यामुळे प्राण्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते तसेच त्यांच्या शारिरीक प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो. प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून इथे आल्यावर शांतपणे प्राण्यांचे बारकाईने निरीक्षण करावे. त्यांना प्रत्यक्ष बघण्याचा आनंद लुटावा आणि निसर्गाचे संगीत ऐकावे.

ह्या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी माझ्याकडे फक्त सहलीचे ठिकाण म्हणून पाहू नका, तर शैक्षणिक केंद्र म्हणून बघा. मग ती दृष्टी तुम्हाला आपोआप लाभेल. प्राणीशास्त्रातील अभ्यासकांनी, विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आणि स्वयंसेवक म्हणून ते प्रत्येक पिंजऱ्याबाहेर माहिती देण्यासाठी उपलब्ध राहिले, तर त्यामुळे एकंदरीत वन्यजीवनाकडे पाहण्याचा सुयोग्य दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आणि आपले ऋणानुबंध अधिक घट्ट होतील. त्यादृष्टीने अनिल परांजपे ह्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सर्वांचेही सहकार्य अपेक्षित आहे. मग कधी येताय मला भेटायला?

पेंग्विनकडे गोड बातमीची शक्यता –
पशू-पक्ष्यांचे वैशिष्ट्य असे आहे, की त्यांना जोपर्यंत त्यांचा राहता परिसर सुरक्षित वाटत नाही, भविष्यात मुलांच्या राहण्या-खाण्या-पिण्याची नीट सोय झाली असे वाटत नाही, तोपर्यंत ते प्रजननासाठी उद्युक्त होत नाहीत. पिलांना जन्म देत नाहीत. एवढेच काय, तर एकमेकांच्या जवळही येत नाहीत.
राणीबागेतले पेंग्विन आता चांगले स्थिरस्थावर झाले आहेत. त्यांनी आपापसात जोड्या तयार केल्या आहेत. राहत्या ठिकाणी ठराविक खडकांमागे प्रजननासाठीच्या योग्य जागाही सुनिश्चित केल्या आहेत आणि काही दिवसात ते गोड बातमी देण्याची शक्यता आहे. यावरून लक्षात येते, की त्यांना राणीबागेचे वातावरण मानवले आहे, इथे त्यांना सुरक्षित वाटत आहे.

प्रदर्शन, सभागृह आणि नवे पिंजरे –
राणीबागेच्या निसर्ग शिक्षण केन्द्रामध्ये प्राण्यांची-पक्ष्यांची माहिती देणारे, आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेले कायमस्वरूपी प्रदर्शन तयार करण्यात येणार आहे. तसेच प्राणीसंग्रहालय विषयाशी संबंधित शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी २०० व्यक्तीसाठींची आसनव्यवस्था असलेले वातानुकुलित सभागृह तयार करण्यात येत आहे. तसेच प्राण्यांच्या अधिवासानुसार पिंजरा आणि तेथील वातावरणाची रचना करण्यात येणार आहे. येत्या काही काळात तिथे १७ देशी-विदेशी प्राणी बघायला मिळणार आहेत. नजीकच्या भविष्यात ही सर्व कामे पूर्ण होऊन प्राणीप्रेमींना अद्ययावत प्राणीसंग्रहालय बघायला मिळणार आहे.