आता मलेशियात ‘पद्मावत’वर बंदी

सामना ऑनलाईन । मुंबई

‘पद्मावत’ चित्रपटामागील वादाचे शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाही. अखेर अनंत अडचणींचा सामना करीत हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. मलेशिया देशात हा वाद सुरू झाला आहे. इस्लामच्या संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित करीत मलेशिया सरकारने ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी आणली आहे.

मलेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे. त्यामुळे ‘पद्मावत’ ची कथा चिंतेचे कारण आहे, असे वक्तव्य नॅशनल फिल्म सेन्सॉरशिप बोर्डचे अध्यक्ष मोहम्मद झांबेरी अब्दुल अझीझ यांनी केले आहे. मलेशिया सरकारच्या बंदी विरोधात पद्मावतच्या वितरकांनी आता फिल्म अपील्स कमिटीसमोर धाव घेतली आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. पाकिस्तान सरकारने मात्र याआधीच एकही कट न सुचवता चित्रपटाच्या प्रदर्शनाला मंजुरी दिलेली आहे.