बंगालमध्ये बेपत्ता भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला, संतापाची लाट

6

सामना ऑनलाईन। मालदा

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार संघर्ष उसळला आहे. मालदा येथून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आशिष सिंह या भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे बंगालमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. त्यातच आज बुधवारी कोलकातामध्ये भाजप बंगाल पोलिसांविरोधात विरोध प्रदर्शन करणार आहे. यामुळे बंगालमध्ये कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी आशिष अचानक मालदा येथून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. पण बुधवारी त्यांचा मृतदेह इंग्लिश बाजार पोलीस ठाणे हद्दीतील बाधापुकूर येथे सापडला. मृतदेहावर जखमांचे व्रण असल्याने आशिष यांची हत्या झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर आशिष यांचा मृतदेह सापडल्यानंतर भाजप कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले असून शेकडोंच्या संख्येने त्यांनी पोलिसांना घेरले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्ते घोषणाबाजी करत आहेत. आशिष यांच्या हत्येप्रकरणी भाजप कोलकातामध्ये आवाज उठवणार आहे. लाल बाजार येथे होणाऱ्या रॅलीत भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत.

याआधी बर्दवानमध्ये भाजपचे मंडळ अध्यक्ष संजय दास यांच्या घरावरही बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. मात्र देशी बनावटीच्या या बॉम्बने कुठलीही हानी झाली नव्हती. पण यावरून नवीन वाद सुरू झाला . भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून टायर जाळून त्यांनी अनेक तास रस्ते रोखून धरले. ममता दीदी चिथावणीखोर भाषण करून तृणमूलच्या कार्यकर्त्यांचे ब्रेन वॉश करत असल्याचा आरोप होत आहे. तर मुकुल रॉय यांनी गृहमंत्री म्हणून अमित शाह यांना चिठ्ठीही लिहिली. तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या