ऐकावं ते नवलचं, चंद्रपूरमध्ये आढळला दूध देणारा बकरा


सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

चंद्रपुरमध्ये एक अजब बकरा आढळला आहे. हा बकरा चक्क दूध देत आहे. या बोकडाला पाहिण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

चंद्रपुरच्या राजुरा भागात राहणार्‍या अब्दुल शेख यांच्याकडे एक बकरा आहे. काही दिवसांपूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी शेख यांनी आपल्या बोकडाला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले होते. जेव्हा डॉक्टरांनी या बोकडाची तपासणी केली तेव्हा हा बकरा दूध देऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला. काही दिवसानंतर डॉक्टरांचा अंदाज खरा ठरला. या बकर्‍याने पहिल्या दिवशी दीड कप दूध दिले.

जेव्हा मालक शेख यांनी बकर्‍याचे दूध नाही काढले तेव्हा बकर्‍याला वेदना व्हायला लागल्या. त्याच्या वेदना कमी होण्यसाठी शेख यांनी दूध काढण्यास सुरूवात केली. जेव्हा या बकर्‍याचे दूध नाही काढले तेव्हा ते आपोआप ओघळू लागले. ही बाब जेव्हा शहरात पसरली तेव्हा लोकांनी या बकर्‍याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.

बोकडाचे दूध यात विशेष काही नाही

ही बाब सामान्य असल्याचे पशुधन विकास अधिकारी प्रमोद जल्लेवार यांनी सांगितले आहे. अनेकवेळा एखाद्या प्राण्याच्या अवयव विकास होण्याची प्रक्रिया रखडते. त्यात दोष निर्माण होतात आणि परिणामी अशी वेगळीच बाब घडते. हीच बाब शेख यांच्या बाबतीत घडल्याचे जल्लेवर यांनी म्हटले. दूध देणार्‍या बकर्‍याचा इतिहास कसा आहे हे पाहिल्यानंतर अंतिम निष्कर्ष काढता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.