आम्ही तुरुंगातच सडायचे काय? लेफ्ट. कर्नल पुरोहित यांचा न्यायालयात सवाल

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉम्बस्फोट प्रकरणातील इतर आरोपींना जामीन मिळतो मग मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींनाच जामीन का मिळत नाही? आम्ही तुरुंगातच सडायचे का, असा प्रश्न लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित केला.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपींविरोधातील सर्वोच्च न्यायालयाने ‘मोक्का’ हटविल्यानंतरही सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याविरोधात लेफ्टनंट सकर्नल प्रसाद पुरोहित यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करून जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पुरोहित यांच्या वतीने अॅड. श्रीकांत शिवदे यांनी बाजू मांडली.

लेफ्टनंट कर्नल पुरोहित गेली आठ वर्षे तुरुंगात आहेत. त्यांच्यावरील मोक्का हटविण्यात आला आहे. आता त्यांच्या विरोधात असलेल्या आरोपामध्ये ते दोषी ठरल्यास जास्तीत जास्त आठ वर्षे शिक्षा होऊ शकते. या खटल्याची तातडीने सुनावणी सुरू केली तरी खटल्यातील सुमारे ५०० साक्षीदारांच्या साक्षी नेंदवून निकाल येण्यास बराच कालावधी लागणार आहे, त्यामुळेच तोपर्यंत आम्ही तुरुंगातच सडायचे काय, असा प्रश्न पुरोहित यांनी उपस्थित केला. पुरोहित यांच्या जामीन अर्जाला राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) विरोध केला आहे. सोमवारी अर्जाची सुनावणी अपूर्ण राहिल्याने खंडपीठाने ती बुधवार पर्य़त (१ फेब्रुवारी) तहकूब ठेवली आहे.