मल्लखांब वर्ल्डकप : सिंगापूर, मलेशियातील खेळाडूंचा कस लागणार

सामना प्रतिनिधी, मुंबई

महाराष्ट्राच्या मातीतल्या ‘मल्लखांब’ या खेळाचा पहिलावहिला वर्ल्ड कप फेब्रुवारी २०१९ मध्ये मुंबईतील शिवाजी पार्क येथे होणार असून या स्पर्धेत सिंगापूर व मलेशिया या देशांतील खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे. विश्व मल्लखांब फेडरेशनचे महासचिव व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती तसेच दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे हे नुकताच या दोन देशांचा यशस्वी दौरा करून परतले. त्यानंतर दोन्ही देशांच्या सहभागावर शिक्कामोर्तब झाले.

‘व्यास योगा’ या योग क्षेत्रात सिंगापूर येथे गेली २० वर्षे कार्यरत असलेल्या संस्थेच्या निमंत्रणावरून उदय देशपांडे यांनी सिंगापूरमधील डी. पी. एस. इंटरनॅशनल या शाळेत आठ दिवसांची दोरीवरील मल्लखांबाची कार्यशाळा घेतली. यापूर्वीही त्यांनी २००६ व २००७ या सालांमध्ये सिंगापूरमध्ये दोन कार्यशाळा घेतल्या होत्या. यामध्ये ३० योग प्रशिक्षक व २३ शालेय विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रशिक्षण घेतले. यातून ग्वेन लिम, लु लु आँग, आयुरी, डायना गुओ, जेराल्दिन अंग, जोआन सेंग, डफ्ने हॅन, युकी ली, टॅन टेक जुऑन, ख्रिस्तीना लेआँग कार्मेन तिओ व रुचिका पटनी अशा बारा जणींची प्राथमिक निवड या कार्यशाळेतून करण्यात आली.

गेली १८ वर्षे सिंगापूरमध्ये वास्तव्याला असलेली पुण्याची राष्ट्रीय मल्लखांबपटू व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू सुलक्षणा राव आणि गेली दहा वर्षे सिंगापूरमध्ये राहणारा समर्थचा माजी राष्ट्रीय मल्लखांबपटू समीर वझे यांनी या संघाच्या पुढील तयारीची जबाबदारी घेतली आहे.