लोकपाल निवड समितीच्या बैठकीवर मल्लिकार्जुन खरगे यांचा पुन्हा बहिष्कार

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

लोकपाल निवड समितीच्या बैठकीवर शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पुन्हा बहिष्कार घातला. यापूर्वीही त्यांनी या बैठकीवर अनेकदा बहिष्कार घातला आहे. यावेळी विशेष आमंत्रित सदस्य म्हणून बोलावल्याने नाराज झालेल्या खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली भूमिका कळवली आहे.

लोकपाल निवडण्यासाठी शुक्रवारी निवड समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आदींचा समावेश आहे. लोकपाल अधिनियम 2013 च्या कलम चारमध्ये लोकपाल निवड समितीच्या बैठकीत विशेष आमंत्रित सदस्यांना सहभागी होता येत नाही असे स्पष्ट केले आहे. मी बैठकीत सहभागी होत नसल्याचे कारण पुढे करून मोदी सरकारने गेली पाच वर्षे लोकपालची नियुक्ती टाळली आहे. या प्रकरणात थोडीफार प्रगती सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यामुळेच झाली, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.