मलखांब सगळय़ांसाठीच

बाळ तोरसकर

मलखांबाला आज जगभरातून मागणी आणि लोकप्रियता मिळत आहे

मागील लेखात आपण मलखांबाचा इतिहास व त्याचा परदेशी वारी कशी होत गेली हे पहिले. अमेरिकेत १९९१ मध्ये झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय व्हिडीओ कॅसेट’ स्पर्धेतही मल्लखांबावरील ‘व्हिडीओ कॅसेटने’ सुवर्ण पदक पटकावले होते. १९९२ मध्ये पुण्याचे क्रीडाप्रेमी गोपाळराव फडके ऑस्ट्रेलियात गेले होते तेंव्हा त्यांनी तेथील ऑस्ट्रेलियन दूरचित्रवाणीवरूनही मल्लखांबाची चित्रफीत प्रदर्शित केली व त्याची जाहीर प्रशंसाही केली गेली. चेंबूर येथील पवनपुत्र व्यायाम मंदिरच्या अदिती कुलकर्णीने १९९९ मध्ये वेस्ट इंडीजमधील जमैका येथे तर सांगलीतील स्वप्नील मुचंडीकरने युगांडा येथे २००० मध्ये तर महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेने मॉरिशस येथे मल्लखांबाची प्रात्यक्षिके दाखवली. त्यानंतर झेक रिपब्लिक, इटली, हाँगकाँग, स्पेन येथे विविध मल्लखांबातील तज्ञ खेळाडू व प्रशिक्षक यांनी संघ नेले व प्रात्यक्षिके दाखवली.

गेल्या काही वर्षांत मलखांबाच्या प्रात्यक्षिकांना प्रचंड मागणी येऊ लागली आहे. त्यामुळेच मल्लखांबपट्टूंना गेल्या काही वर्षात केवळ परदेशवारीचीच संधी नव्हे तर आर्थिक प्राप्ती सुद्धा होऊ लागली आहे. त्यामुळेच अनेकांनी अमेरिका, मेक्सिको, जर्मन, युरोपपासून चीन पर्यंत अशा अनेक देशांत मल्लखांबाचा प्रचार करताना प्रात्यक्षिके सादर केली. साताऱयाच्या विशाल व विक्रांत दाभाडे बंधूही वेस्ट इंडीजला जाऊन आले. तर उपनगरच्या अनुप ठाकूरने जोर्जीयातील एका दूरचित्रवाणीवर रिऑलिटी शोमध्ये बाटल्यांवरील मल्लखांबाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले होते. मुंबई बरोबरच मुंबई उपनगरमधील मल्लखांबपट्टूंचा प्रदेशातील मल्लखांबाचा प्रात्यक्षिकांमधील सहभागाचा आलेख दिवसेंदिवस चढताच आहे. यावेळी परदेशी क्रीडा रसिकांकडून मनापासून मिळणारी दाद खेळाडूंच्या उत्साहात भरच घालत असते.

या सर्व प्रयत्नांत मुंबईतील श्री समर्थ व्या. मंदिरचा मल्लखांबातील सिंहाचा वाटा कोणीही विसरू शकत नाही. श्री समर्थचे नारायण भट व कल्याणचे पुरुषोत्तम सावंत यांनी १९६९ साली जर्मनीत प्रात्यक्षिके सादर केली व तेथील तज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ते गेले होते. त्यांच्याच दीपाली आठल्येने फ्रांस येथे, लेबाना पेणकरने इस्रायल येथे, जाई नेर्लेकरने जपान येथे, स्वाती आधारकरने इंग्लंड येथे, शुभदा अत्रे, गायत्री आठल्ये, शीतल देसाई, सुशील सात्त्विक यांनी फ्रांस येथे मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली तर फिनलंड येथे संगीता म्हसकर, मनीषा शानबाग व वीणा भावे यांनी दोरी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली होती. त्यानंतर १९९९६ साली ओंकार देशपांडे, कुणाल चोक्सी, अदिती शेटे, ममता ओक, रेश्मा धर्माधिकारी व रश्मी गणपुले यांनी अमेरिकेत, तर पुढच्याच वर्षी म्हणजे १९९७ साली श्री समर्थने १५ मल्लखांबपट्टूंचा चमू उदय देशपांडेच्या नेतृत्वाखाली जपानला पाठवून मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली व ते निप्पॉन टीव्हीने लाईव्ह दाखवून तेथील लोकांची मने जिंकली. त्यानंतर श्री समर्थ व्यायाम मंदिरने सातत्याने देश-विदेशात अनेक मल्लखांबपट्टूंच्या जोरावर प्रात्यक्षिके सादर करत मल्लखांबाचा आलेख नेहमीच चढता ठेवला. त्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरचे दादोजी कोंडदेव पुरस्कार विजेते उदय देशपांडे यांनी मोलाची कामगिरी बजावली असून त्याला नीता ताटके व श्रेयस म्हसकर यांची मोलाची साथ लाभली आहे.

अमेरिकन गॅबोर झँटो यांना मल्लखांबाने इतकी भुरळ घातली की ते १९९१ ते १९९५ या कालावधीत सतत पाच वर्षे वर्षातून एक महिना दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिर येथे सकाळ – संध्याकाळ मल्लखांब शिकत असत. श्री समर्थने त्यांना प्रेमाने दिलेला मल्लखांब त्यांनी न्यूयॉर्कमधील आपल्या अपार्टमेंटच्या ११ व्या मजल्यावर लावला असून तेथे ते नियमितपणे मल्लखांबाचा सराव करतच होते व त्याचवेळी इतरांनाही ते शिकवायला मागेपुढे पाहत नसत. जवळ जवळ ३२ देशांतील दोनशेहून अधिक लोकांनी फक्त मल्लखांब शिकण्यासाठी शिवाजी पार्कातील श्री समर्थ व्यायाम मंदिरला पायधूळच झाडली नाही तर तो शिकलासुद्धा. त्यामुळेच मल्लखांबाने देश – विदेशात मोठी मजल मारली आहे. यामुळे युरोप, अमेरिका व आशिया खंडातील अनेक देशांमध्ये नियमित मल्लखांब प्रशिक्षण वर्गही सुरु झाले आहेत. जर्मनी मल्लखांब फेडरेशन व यू. एस. मल्लखांब फेडरेशन यांची त्यांच्या त्यांच्या देशांत नोंदणी झालेली आहे ही मल्लखांबासाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

१५ जून हा जागतिक मल्लखांब दिन म्हणून साजरा होणार आहे. आंतरराष्ट्रीय मल्लखांब फेडरेशनची स्थापना झाली असून वेगवेगळे देश त्याला संलग्न झाले आहेत. पहिली मल्लखांब विश्वचषक स्पर्धा शिवाजी पार्कातील श्री समर्थ व्या. मंदिराच्या प्रांगणात १५-१६ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आयोजित केली आहे.