मातीतले खेळ…मलखांब

बाळ तोरसकर,[email protected]

कोणत्याही वयात शिकता येतो

मलखांब खेळण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही. आज कोणत्याही मलखांब शिकवल्या/शिकल्या जाणाऱया क्लब/मंडळ/व्यायाम शाळेत गेले तर लहान मुलांपासून कोणत्याही वयातील व्यक्ती मलखांब शिकताना दिसतात.

मलखांब म्हटल्याबरोबर पिळदार शरीरयष्टी लाभलेले दणकट तरुण व दणकट तरुणी (?) नजरेसमोर येतात. (नाजूक स्रीला दणकट संबोधने जरा मनाला न पटणारेच होईल, नाही का?) कधी कधी त्यांनी पुरलेल्या मलखांबावर किंवा दोरी मलखांबावरील केलेल्या शारीरिक कसरती पाहिल्यावर असे वाटते की या खेळाडूंच्या शरीरात हाडे आहेत की नाहीत? इतक्या अप्रतिमरीत्या ते आपले कौशल्य सादर करत असतात. सुरुवातीला अनेक वर्षे मलखांब हा प्रामुख्याने खेडोपाडी, गावोगावी खेळला जात असे. त्या वेळी त्याचे बहुतांशी स्वरूप हे व्यायामात्मक किंवा प्रदर्शनात्मक असायचे. जत्रेमध्ये किंवा कुस्त्यांच्या दंगलीत हमखास मलखांबाचे प्रदर्शनीय खेळ ठेवले जात असत व ते भरपूर गर्दीही खेचत असत.

खरंतर मलखांब खेळण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही. आज कोणत्याही मलखांब शिकवल्या/शिकल्या जाणाऱया क्लब/मंडळ/व्यायाम शाळेत गेले तर लहान मुलांपासून कोणत्याही वयातील व्यक्ती मलखांब शिकताना दिसतात. म्हणतात ना खेळायला वय लागत नसतं. आनंदी व तंदुरुस्त राहण्यासाठी वय कधीच आड येत नाही. प्रत्येक वेळी पदक मिळवण्यासाठीच खेळले पाहिजे असे काही नाही. त्या खेळात आपण राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेच पाहिजे असा काही दंडक नाही. तर आपण स्वतः खेळाचा आनंद घ्यायचा ठरवलं तर आपण त्या त्या खेळात प्रगती नक्की करू शकतो.

मलखांबाला एक पुरेपर खेळ म्हणून पुढे आणताना अखिल महाराष्ट्र शारीरिक मंडळाने मलखांबाची स्पर्धात्मक नियमावली तयार केली. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाने मुंबई पातळीवर तर बडोद्याच्या हिंदविजय जिमखान्याने अखिल भारतीय पातळीवर मलखांबाच्या नियमित स्पर्धा भरवायला सुरुवात केली. कै. रामदास कल्याणपूरकर व त्यांच्या अन्य सहकाऱयांच्या प्रयत्नाने १९६१-६२ पासून ‘जिमन्यास्टिक फेडरेशन ऑफ इंडिया’च्या माध्यमातून त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धांमधून जिमन्यास्टिकबरोबरच मलखांबाचाही समावेश केला. त्या सरळ १९७६ पर्यंत नियमित घेतल्या गेल्या. १९६८-६९ साली अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिमन्यास्टिक्स स्पर्धांमध्येही जिमन्यास्टिकबरोबर पुरलेल्या मलखांबाच्या स्पर्धा सुरू झाल्या. २००५ पासून त्यात महिलांच्या दोरी मलखांब स्पर्धाही सुरू झाल्या व त्या आजतागायत सुरू आहेत.

मलखांबाला भारतीय ऑलिम्पिक महासंघाने १९९८ साली मलखांबास मान्यता दिली, मात्र अजूनही संलग्नता दिली नाही. मलखांबामध्ये पुरुष व महिला असे दोन विभाग असतात. पुरुष विभागात चार वयोगट असून त्यात १२ व १४ वर्षांखालील दोन वयोगटांना पुरलेल्या मलखांबावरील स्पर्धा असतात तर १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील खेळाडूंसाठी पुरलेला, टांगता व दोरीचा असे तिन्ही प्रकारच्या स्पर्धा असतात. महिला विभागातसुद्धा १२, १४, १६ वर्षांखालील व १६ वर्षांवरील सर्व प्रकारात खेळाडूंना फक्त दोरीचा मलखांबा सादर करायचा असतो. प्रत्येक स्पर्धकाला कमाल ९० सेकंदांचा (दीड मिनिट) वेळ दिला जातो. तेवढय़ा मोजक्या वेळात खेळाडूने मलखांबावर प्रदर्शित केलेल्या कौशल्याचे मुल्यांकन चार पंच व एक पंचप्रमुख करत असतात व त्यांना वेळाधिकारी व गुणलेखक यांची साथ लाभते.

चार पंचांनी स्पर्धकाला दिलेल्या गुणांपैकी सर्वाधिक व सर्वात कमी गुण बाद करून मधल्या दोन गुणांची सरासरी ही पंचप्रमुखाने दिलेल्या गुणांशी पडताळून ते गुण स्पर्धकास मिळालेले गुण म्हणून जाहीर केले जातात. स्पर्धकाला दिलेल्या कमाल १० गुणांमध्ये ५ गुण सादरीकरण, ३.४ गुण काठिण्यासाठी व १.६ गुण जुळणीसाठी दिले जातात. याचाच अर्थ तुम्ही किती कठीण कौशल्य सादर करता यापेक्षा जे सादर करता ते किती सहजतेने व अचूकतेने सादर करता याला जास्त महत्त्व व गुण दिले जातात. सांघिक विजेतेपदासाठी प्रत्येक संघातील चारपैकी सर्वाधिक गुण मिळवणाऱया तीन खेळाडूंच्या गुणांची बेरीज केली जाते व ती त्या संघाची गुणसंख्या धरून सर्वाधिक गुण मिळवणारा संघ विजेता घोषित केला जातो. प्रत्येक साधनावर केलेल्या प्रदर्शनावरही विजेता त्या त्या विभागात घोषित केला जातो. यात अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत महाराष्ट्रानेच वर्चस्व राखले असले तरी मध्य प्रदेश, तामीळनाडू व गुजरात हे नेहमीच कडवी लढत देताना आढळतात.