हिंदुस्थान सोडण्यापूर्वी जेटलींना भेटलो! मल्ल्याचा दावा


सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थान सोडण्याआधी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो होतो असा दावा विजय मल्ल्याने आज लंडन येथे न्यायालयातील सुनावणीवेळी केला.

बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून मल्ल्या 2 मार्च 2016 ला लंडनला फरार झाला. मल्ल्याचे प्रत्यार्पण करून ताब्यात द्यावे अशी मागणी हिंदुस्थानने ब्रिटन सरकारकडे केली. लंडन येथील वेस्टमिनिस्टर कोर्टाने एप्रिल महिन्यात मल्ल्याविरुद्ध वॉरंट जारी केले होते. सध्या तो जामिनावर आहे.

काय म्हणाला मल्ल्या

  • बँकांच्या कर्जाचा विषय सेटल करावा, अशी विनंती मी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून केली होती.
  • अर्थमंत्र्यांबरोबरच्या बैठकीत काय झाले याची सविस्तर माहिती सांगण्यास मल्ल्याने नकार दिला. मात्र कर्नाटक हायकोर्टात कर्जासंदर्भात मी योग्य सेटलमेंट केले आहे. यातून सर्वांना पैसे परत मिळतील असे मल्ल्याने सांगितले.

मल्ल्या खोटारडा, जेटलींनी फटकारले

विजय मल्ल्या खोटारडा आहे अशा स्पष्ट शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फटकारले आहे. फेसबुकवर सविस्तर पोस्ट टाकून जेटली यांनी याबाबत आरोपांचे खंडन केले आहे. ‘2014 पासून एकदाही मी मल्ल्याला भेटीची वेळ दिली नाही. पण मल्ल्या राज्यसभा सदस्य असल्याने कधीतरी सभागृहात येत होता. सभागृहाच्या कामकाजानंतर एकदा मी माझ्या चेंबरकडे जात होतो. तो धावत माझ्याकडे आला. बँकांच्या कर्जाच्या सेटलमेंटसाठी एक ऑफर तयार करीत आहे असे तो म्हणाला. ती ऑफर कोणती हे ऐकण्याचा मी प्रयत्नही केला नाही. त्याला मी धुडकावले. माझ्यापुढे ऑफर ठेवण्याचा काहीही उपयोग नाही, असे मी त्याला स्पष्टपणे सांगितले.