कर्जबुडव्या मल्ल्याने कर्जाचे पैसे कार रेसवर उधळले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्जबुडव्या विजय मल्ल्याने बँकाकडून घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज फॉर्म्युला वन रेसवर (F1) उधळले आहे. मल्ल्याच्या या उधळपट्टीची माहिती ईडीने (अंमलबजावणी किंवा सक्तवसुली संचालनालय) दिली आहे. मल्ल्याने हिंदुस्थानातील विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी सुमारे नऊ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असताना लंडनला पलायन केले. मल्ल्या पळून गेल्याचे उघड होताच ईडीने त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली. या तपासणीत मल्ल्याच्या उधळपट्टीची माहिती ईडीच्या हाती लागली आहे.

विजय मल्ल्याने आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या कर्जातील ५३.६९ कोटी रुपये कार रेसिंगवर उधळले. बेकायदा आर्थिक व्यवहार करणाऱ्या मल्ल्याला यंदाच्या वर्षी (२०१७) लंडनमध्ये दोन वेळा अटक झाली. दोन्ही वेळा मल्ल्या अटकेनंतर काही तासांतच जामीन मिळवण्यात यशस्वी झाला आहे. मल्ल्याला जामीन मिळाला असला तरी सीबीआय आणि ईडी या संस्थांनी मल्ल्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू ठेवली आहे. आतापर्यंतच्या चौकशीआधारे मल्ल्याविरोधात हिंदुस्थानात तसेच लंडनमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मल्ल्याने बँकाकडून कर्जस्वरुपात घेतलेल्या रकमेचा वापर भलत्याच कारणासाठी केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

मल्ल्याने अडचणीत सापडलेल्या किंगफिशर एअरलाईन्स कंपनीला वाचवण्यासाठी आयडीबीआयकडून ९५० कोटींचे कर्ज घेतले होते. पण ती रक्कम त्याने तिथे न वापरता दोन टप्प्यात त्याच्या मालकीच्या फोर्स इंडिया या फॉर्म्युला वन कार रेसिंग टीममध्ये गुंतवली असा आरोप ईडीने केला आहे.या पार्श्वभूमीवर येत्या डिसेंबरमध्ये मल्ल्याच्या हस्तांतरणाबाबत सुनावणी होणार आहे.