धारावीत गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार

सामना प्रतिनिधी । मुंबई

घराबाहेर खेळणाऱ्या दहा वर्षीय गतिमंद मुलीवर चक्कीच्या मालकासह एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची किळसवाणी घटना धारावीत घडली. याप्रकरणी शाहूनगर पोलिसांनी 64 वर्षीय चक्कीवाल्याला अटक करून 13 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.

रविवारी दुपारी ती मुलगी घराबाहेर खेळत असताना 64 वर्षीय जगदीश (नाव बदललेले) याने मुलीला फूस लावून त्याच्या चक्कीमध्ये नेवून बलात्कार केला. त्याने एका 13 वर्षीय मुलालादेखील हे कृत्य करायला लावले. दोघांनी लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलीला सोडून दिले. सोमवारी सकाळी मुलीला प्रचंड वेदना आणि रक्तस्राव होऊ लागल्यामुळे तिच्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले. तेव्हा मुलीसोबत गैरकृत्य झाल्याचे समोर आले. त्यामुळे मुलीच्या पालकांनी शाहूनगर पोलिसांत तक्रार दिली. मुलगी गतिमंद असल्यामुळे पोलिसांनी शीव रुग्णालयातील मनोविकारतज्ञांची मदत घेतली. तेव्हा मुलीने दिलेल्या माहितीनुसार परिसरातील चक्की मिलचा मालक आणि एका 13 वर्षीय मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी 13 वर्षीय मुलाला ताब्यात घेतल्यावर त्याने गुह्याची कबुली दिली.