सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनची घुसखोरी

सामना प्रतिनिधी। मालवण

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर किल्ले सिंधुदुर्ग मागील समुद्रात परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनधारक ट्रॉलर्संनी घुसखोरी केली असून मासळीची लूट सुरू केली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार संतप्त झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाकडे कारवाई करण्यास गस्ती नौकाचा उपलब्ध नसल्याने मच्छिमारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मत्स्यहंगामाच्या सुरुवातीपासूनच परराज्यातील हायस्पीड, पर्ससीन ट्रॉलर्सनी दहा ते बारा वावाच्या आत घुसखोरी करून मासळीची लूट करण्यास सुरवात केली आहे. शनिवारपासून पर्ससीनची अधिकृत मासेमारी सुरू झाली. त्यामुळे पहिल्याच दिवशी त्यांनी येथील किल्ल्यापासून निवतीपर्यंतच्या समुद्रात घुसखोरी केली. रात्री उशिरापर्यंत हायस्पीड, पर्ससीनधारकांकडून मोठ्या प्रमाणात मासळीची लूट सुरू होती. रविवारी दुसर्‍या दिवशीही किल्ल्यानजीकच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनधारक ट्रॉलर्सनी धुमाकूळ घातल्याचे दिसून आले. सातत्याने परराज्यातील ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू असताना मत्स्य व्यवसाय विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने मच्छीमारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

याप्रकरणी स्थानिक मच्छीमारांनी रविवारी सायंकाळी मालवण दौर्‍यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली. याची तत्काळ दखल घेत आमदार नाईक यांनी मत्स्य व्यवसाय उपायुक्त राजेंद्र जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी गस्तीनौका बंद असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे नाईक यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधत शासनाची गस्तीनौका येईपर्यंत खासगी नौकेद्वारे उद्यापासून गस्त सुरू करावी अशी सूचना केली आहे.

दरम्यान,पोलिसांची गस्तीनौका येत्या काही दिवसात सुरू होईल. मात्र ही गस्तीनौका पाच नॉटीकल अंतरापर्यंत गस्त घालते. त्यामुळे त्यापुढील क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारीवर कोण कारवाई करणार असा प्रश्‍न मच्छीमारांनी उपस्थित केला आहे. शिवाय मासेमारी हंगाम सुरू होऊन महिन्याचा कालावधी उलटला असतानाही शासनाची गस्तीनौका अद्यापपर्यंत का दाखल झाली नाही. समुद्रात पारंपरिक, पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्स यांच्यात सातत्याने होत असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर हंगाम सुरू होण्यापूर्वीच शासनाची गस्तीनौका सज्ज असणे आवश्यक होते. मात्र याची कार्यवाही न झाल्याने पारंपरिक मच्छीमारांना पुन्हा एकदा समुद्रात संघर्ष करावा लागणार असण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

summary-malvan-highspeed-boat-of-outsider-enter-in-sindhudurg-sea