परराज्यातील घुसखोर बोटींवर सागरी पोलिसांचा वॉच

सामना प्रतिनिधी। मालवण

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील बोटींची होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी आता सागरी पोलिसांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जाणार असून परराज्यातील नौकांची १२ नॉटीकलच्या आत होणारी घुसखोरी रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुग्ध, मत्स्य, पशुसंवर्धन विभाग सचिव अनुपकुमार यांना दिले आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

मत्स्यहंगामाच्या सुरूवातीलाच परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनधारकांनी धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी दुग्ध, मत्स्य, पशुसंवर्धन विभागाचे सचिव अनुपकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकांत परदेशी उपस्थित होते.

परराज्यातील नौकांची घुसखोरी रोखण्यास सागरी पोलिसांची मदत घेण्याचे तसेच यासाठी त्यांच्या अधिकारात (सागरी हद्द) वाढ करण्याची तयारी दर्शविण्यात आली. यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक असून याची कार्यवाही केली जाईल. जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनधारकांनी घुसखोरी करून मासळीची लूट करण्यास सुरवात केल्याने पारंपरिक व हायस्पीड, पर्ससीनधारकांमधील संघर्ष उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दुग्ध, मत्स्य, पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

मागील आठवड्यात आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य आयुक्त, जिल्हाधिकारी, व पोलीस अधीक्षक यांचे लक्ष वेधत सागरी गस्त सुरू करत घुसखोरी करणाऱ्या बोटींवर कारवाईची मागणी केली होती. त्यांनंतर गस्त सुरू करण्याच्या हालचाली मत्स्य विभागाने सुरू केल्या होत्या. आता पुन्हा एकदा आमदार नाईक यांनी सिंधुदुर्गातील मच्छिमारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

पारंपरिक, पर्ससीनधारक यांच्यातील संघर्षामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे दंडात्मक रकमेत वाढ करण्याची कार्यवाही जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या स्तरावर करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दंडात्मक रकमेतही वाढ करण्याची कार्यवाही येत्या काळात होईल. शिवाय सागरी गस्तीसाठी सागरी पोलिसांचीही मदत मिळणार असून त्याची कार्यवाही लवकरच होईल असेही नाईक यांनी सांगितले.

मोठ्या जहाजातून सागरी गस्त ?

सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात गुरुवारी सकाळपासूनच एका मोठ्या जहाजाद्वारे पाहणी सुरू असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून मिळाली. मात्र हे जहाज तटरक्षक दलाचे की नौदलचे याची माहिती स्थानिक सुरक्षा यंत्रणेस नव्हती. सध्या जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परराज्यातील हायस्पीड व पर्ससीन नौकांकडून होत असलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाकडून पाहणी सुरू होती की ते मालवाहू जहाज होते. याची नेमकी माहिती मिळाली नाही.