सातवी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा आज मालवणात

सामना ऑनलाईन । मालवण 

मालवण चिवला बीच येथे रविवारी (८जानेवारी) होण्याऱ्या सातव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी तब्बल एक हजार स्पर्धकांची नोंदणी करण्यात आली आहे. कोकण, मुंबई, पुणे, नागपुर, गडचिरोली अश्या राज्यातील २६ जिल्ह्यातील तसेच गोवा, पश्चिम बंगाल गुजरात या राज्यातील स्पर्धक व त्यांचे नातेवाईक स्पर्धेसाठी मालवण येथे दाखल झाल्याने शनिवारी मालवण चीवला किनारपट्टीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

महारष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवारी सकाळी ६ वा. बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते माधव भंडारी, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तथा मालवण तहसीलदार विरधवल खाडे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. तर परितोषिक वितरण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

किनारपट्टी जीव सुरक्षा हा संदेश घेऊन होणाऱ्या या सातव्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मालवण नगरपरिषद, नगरसेवक, पर्यटन व्यावसाईक व नागरीकांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष मिलिंद राणे व सचिव राजेंद्र पालकर यांनी सांगितले.

विविध ११ विविध गटात होणार स्पर्धा 

पाच किमी,तीन किमी,दोन,एक किमी  व ५०० मीटर या अंतरात विविध ११ विविध गटात होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील २६ जिल्ह्यातून ६ ते ८५ वयोगटातील एक हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. पुरुष, महिला, मुले व अपंग स्पर्धकांचा यात सहभाग असणार आहे. गतवर्षी ८०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. दरवर्षी स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद पाहता या वर्षीही स्पर्धेला राज्यभरातील स्पर्धकांची मोठी गर्दी उसळली, मात्र स्पर्धा नियोजनाचा विचार करता एक हजार स्पर्धकांना स्थान देण्यात आले. तर स्पर्धकांबरोबर त्यांचे पालक मित्रपरिवार यांच्यासाठी शनिवारी चीवला बीच येथे विविध बीच गेमचे आयोजन करण्यात आले होते. मालवणच्या पर्यटन वाढीस तसेच पर्यटन  प्रसार आणि प्रचारासाठी ही स्पर्धा मोठा वाटा उचलत असल्याचा विश्वास यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.