मालवणातील अनेक गावे अंधारात, वीज वितरणाच्या कारभारावर ग्रामस्थ संतप्त

82

सामना प्रतिनिधी, मालवण

तालुक्यात अनेक गावांत वीज खांब तुटून वीज पुरवठा खंडित झाला आहे. शहरातही सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. तरी खंडित वीजपुरवठा तात्काळ सुरू करा. तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीज प्रश्न सोडवा. अश्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी वीज अधिकाऱ्यांना केल्या. पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न झाल्याने वीज समस्या अधिक निर्माण झाल्याचे खडेबोल आमदार नाईक यांनी वीज अधिकाऱ्यांना सुनावले.

मालवण येथील वीज समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता संजय गवळी व मालवण वीज अधिकारी यांची आढावा बैठक मालवण वीज वितरण कार्यालयात पार पडली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, आरोग्य सभापती पंकज सादये, नगरसेवक सेजल परब, सुनीता जाधव, रवी तळाशीलकर, तपस्वी मयेकर, आतु फर्नांडिस, किसन मांजरेकर, भाई ढोके, महेश शिरपुटे यासह अन्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष, तालुकाप्रमुख यांनी अनेक समस्या मांडल्या. वीज वितरणाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. तर उपतालुकप्रमुख गणेश कुडाळकर यांनी वीज समस्या न सुटल्यास वीज कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. वीज तारांवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळेही सातत्याने वीज खंडित होते. तरी वीज वाहिन्यांवरील झाडे तोडण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा. अशाही सूचना आमदार नाईक यांनी केल्या.

ग्रामस्थ आक्रमक
नांदरुख, साळकुंभा, आनंदव्हाळ कातवड, घुमडे आदी भागात काही ठिकाणी वीज पोल कोसळून गेले आठ दिवस वीज पुरवठा खंडित होता. वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने संतप्त ग्रामस्थानी मालवण वीज कार्यालयात धडक देत अभियंत्यांना जाब विचारला. स्थानिक युवकांनी सहकार्य करूनही वीज कर्मचारी दुरुस्ती व नवीन वीज पोल उभरण्याबाबत उद्धट उत्तरे देत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला. तत्काळ वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनात्मक पवित्र घ्यावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या