आठवडा बाजार बैठक व्यवस्थेला मालवणातील व्यापाऱ्यांचा विरोध

सामना ऑनलाईन । मालवण

मालवण शहरात सोमवार आठवडा बाजारा दिवशी रस्त्याच्या दुतर्फा मांडलेल्या दुकानांमुळे पादचाऱ्यांना अनेक अडचणी येतात. बाजारपेठेत सकपाळ नाका मार्गापर्यंत दुकानांची रांग असते. याबाबत पालिकेला प्राप्त तक्रारी नुसार सोमवारी (१६) आठवडा बाजार भाजी मंडईत भरण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र भाजी मंडईतील अपुरी जागा व काही व्यावासिकांचा झालेला विरोध लक्षात घेता पालिका प्रशासनाला सोमवार २३ जानेवारी पर्यंत मोहीम गुंडाळावी लागली.

दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा मांडण्यात आलेल्या दुकानांवर सोमवारी कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या कर्मचार्याना व्यापार्यांच्या नाराजीचा फटका सहन करावा लागला. काही व्यापार्यांनी आपल्याला पालिकेची नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे नगराध्यक्षांच्या आदेशाने पुढच्या सोमवार पर्यंत ही मोहीम पुढे ढकलण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

आठवडा बाजार दिवशी पालिकेकडून करण्यात येणाऱ्या व्यापार्यांच्या बैठक व्यवस्थेबाबत नगराध्यक्ष महेश कांदळकर यांना विचारले असता, व्यापारी, ग्राहक व पादचारी यांना कोणताही अडथळा होणार नाही अश्या दृष्टीने नियोजन सुरु आहे. भाजी मंडईत व्यापाऱ्यांना अपुरी बैठक व्यवस्था असल्यास भाजी मंडई ते किनाऱ्यावर नेहमीच्या बैठक व्यवस्था ठिकाणी मातीचे ढिग हटवून अधिकची बैठक व्यवस्था केली जाईल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही. मात्र सकपाळ नाका ते भाजी मंडई प्रवेशद्वार या रस्ता मार्गावर व्यापार्यांना बसता येणार नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.