अस्सल मालवणी टॅलेंट पोचले मुंबईक!

सामना ऑनलाईन । मुंबई

मालवणच्या मातीत रुजलेल्या, फुललेल्या आणि स्थानिक मालवणी कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या ‘गेले भजनाक, पोचले लग्नाक’ या नाटकाची अमृत महोत्सवी वाटचाल सुरू झाली आहे. मालवणी बोलीतील सिंधुदुर्ग जिह्यातील हे पहिलेवहिले व्यावसायिक नाटक आहे. नाटकाने मुंबईच्या प्रेक्षकांनाही चांगलेच वेड लावले आहे. नाटकाचा ७४ वा प्रयोग २८ ऑक्टोबर रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

मालवणातील युवा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शहरातील युवकांनी एकत्र येऊन कलांकुर ग्रुपची स्थापना केली आहे. कलांकुर ग्रुपने २९ मे २०११ रोजी मालवणच्या मामा वरेरकर नाटय़गृहात शुभारंभाचा पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर कोकणात या नाटकाचे दिमाखदार प्रयोग होत आहेत. नाटकाचे लेखक प्रभाकर भोगले यांनी एका दिवाळी अंकात लिहिलेल्या ‘भजन’ कथेवर आधारित हे नाटक आहे. भोगले यांच्या कथेवर काही वर्षांपूर्वी कणकवलीच्या शरद सावंत यांनी एकांकिका सादर केली होती. त्यानंतर कलांकुर मालवण या नाटकवेडय़ा संस्थेने त्याचे व्यावसायिक नाटय़ात रूपांतर केले आहे. एखाद्या स्थानिक संस्थेने स्थानिक भाषेत, स्थानिक कलाकारांना घेऊन रंगमंचावर आणलेले व्यावसायिक नाटक तसे दुर्मीळ आहे. कोणतेही फारसे आर्थिक बळ नसताना नाटकाने पहिल्या वर्षी २५ प्रयोगांची मजल मारली. नाटकाचे कोकणाबाहेरही मोठय़ा प्रमाणात प्रयोग झाले आहेत.

‘गेले भजनाक, पोचले लग्नाक’चे दिग्दर्शन रघुनाथ कदम यांचे आहे, तर निर्माते राजेंद्र कदम, रूपेश नेवगी, सचिन टिकम, शरद सावंत, हेमंत कदम यांचे आहे. संगीत सदा कुडाळकर, नेपथ्य रूपेश नेवगी, प्रकाश, संजय तोडणकर, रंगभूषा तारक कांबळी, तर संगीत संयोजन शुभदा टिकम आणि वीरेश वळंजू यांचे आहे.