मामा देवस्थळी

2

डोंबिवलीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विष्णू गजानन ऊर्फ मामा देवस्थळी हे डोंबिवलीत घराघरात पोहोचलेले व्यक्तिमत्त्व होते. १९६७ सालापासून डोंबिवलीत ते वास्तव्याला होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लहानपणीच जोडले गेल्यानंतर संघ परिवारातील विविध संस्थांशी त्यांचा संपर्क आला. मात्र त्यातही वनवासी कल्याण आश्रमाशी ते अधिक जोडलेले राहिले. वनवासी बांधवांच्या समस्येची माहिती त्यांनी जवळून घेतली. वनवासी कल्याण आश्रमाचे सचिव, जिल्हा संघटक अशी पदे त्यांनी भूषवली. मूळचे रत्नागिरी जिह्यातील खारेपाटण येथील असलेले मामा संघ आणि विवेकानंद सेवा मंडळ यांच्या कार्याच्या माध्यमातून डोंबिवलीतील घराघरात पोहोचले होते. डोंबिवलीतील सुपरिचित व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात. सत्तरीच्या दशकात आणीबाणी व सरकारी दडपशाहीविरोधात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. आंबिवली येथील नॅशनल रेयॉन येथे देवस्थळी यांनी नोकरी केली. रा. स्व. संघाचे सचिव या नात्याने त्यांनी ठाणे व पालघर जिह्याचा दौरा केला. उच्चशिक्षित तरुणांना सेवा कार्यात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने विवेकानंद सेवा मंडळाची स्थापना केली. समर्थ हिंदुस्थानचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी डोंबिवलीत विवेकानंद सेवा मंडळाने उच्चशिक्षित तरुणांसाठी गेली २५ वर्षे ज्ञानयज्ञ चालवला आहे. आदर्शाच्या फक्त गप्पा न मारता समाजात नवी मूल्ये रुजवण्याचे काम देवस्थळी यांनी केले. गरीब मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, रोजगारांसाठी मार्गदर्शन  करणाऱ्या अनेक संस्था आहेत, पण सामाजिक बांधिलकी, राष्ट्रभक्ती व चारित्र्यसंपन्नतेचे संस्कार देण्याचे काम विवेकांनंद सेवा मंडळाकडून केले जाते. २५1 वर्षांपूर्वी व्हीजेटीआयचे प्राध्यापक नाखरे यांच्या मदतीने डोंबिवलीत त्यांनी अभियांत्रिकी वाचनालय सुरू केले. तरुणांना एकत्र करून सेवाकार्यासाठी प्रेरित केले. स्वतःला उच्च शिक्षण घेणे शक्य न झाल्याचे शल्य त्यांना होते व यातूनच त्यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना लागणारे वाचनालय सुरू केले. ते आज डोंबिवलीत नावारूपाला आले आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने त्यांच्या कामाची पावती म्हणून ‘डोंबिवली सेवा पुरस्कार’ देऊन गौरव केला होता. प्रसिद्धीच्या झोतापासून त्यांनी कायम स्वतःला लांब ठेवले. त्यांच्या निधनाने रा. स्व. संघाचा एक सेवाक्रती स्वयंसेवक काळाच्या पडद्याआड गेला आहे.