पश्चिम बंगालला गुजरात बनवण्याचा डाव; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

8

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रातील सत्ताधारी भाजप नेत्यांकडून पश्चिम बंगालचा वारंवार अपमान केला जात आहे. बंगालला गुजरात बनविण्याचा डाव आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. मी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा आदर करते, मात्र  प्रत्येक संविधानिक पदाच्या काही मर्यादा असतात. या मर्यादा त्यांनी पार करू नयेत, असा इशारा त्यांनी दिला.

लोकसभा निकडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या हिंसाचारात महाविद्यालयातील ईश्वरचंद्र यांचा पुतळा तुटला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नव्याने बसविण्यात आलेल्या अर्धपुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाला बॅनर्जी यांनी बांगला अस्मितेशी जोडत बंगालची संस्कृती वाचवायची असेल तर भाजपविरोधात एकत्र या, असे आवाहन केले. पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे राज्यपाल  केशरीनाथ त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे मुख्यमंत्री बॅनर्जी चांगल्याच संतापल्या असून बंगालला गुजरात बनकण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

राजकीय दंग्याची शिकार झालेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत 

मी गुजरातच्या विरोधात नाही, मात्र गुजरातमध्ये दंगल घडवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी पहिल्यांदाच राज्यात राजकीय दंगे झाल्याचे मान्य केले. या दंग्यांमध्ये भाजपचे दोनच कार्यकर्ते मारले गेले तर तृणमूल काँग्रेसच्या 10 कार्यकर्त्यांचा यात मृत्यू झाला आहे. राजकीय दंग्यांचे शिकार झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करा!

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराने कळस गाठला असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार अपयशी ठरले आहे. लोकशाहीत संविधानविरोधी कृत्य ममता बॅनर्जी करीत आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही व्यवस्थेत त्या हुकूमशाही चालवत आहेत. पोलिसी बळाचा वापर करून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे खून होत आहेत. राज्यात हिंसाचार बोकाळल्यामुळे बंगालवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. या परिस्थितीत पश्चिम बंगालमध्ये शांतता आणि कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करायची असेल तर तेथील सरकार त्वरित बरखास्त करावे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या