व्याजाने पैसे मिळवून देण्याचे आमिष, बचत गटाच्या महिलांना दीड लाखांचा गंडा

8

सामना प्रतिनिधी । तीर्थपुरी

तिरुपती बालाजीचे पैसे अत्यंत कमी व्याजाने मिळवून देण्याच्या नावाखाली एका भामट्याने बचत गटाच्या महिलांना लहान मुलांच्या खेळण्यातील आठ लाखाच्या नकली नोटा हवाली करत दीड लाखाला गंडा घातला. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात मुफराज राजू खान रा. शिवपुरा ता. निपाई, जि. टोक राजस्थान या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील रुख्मिन अशोकतिडके रा. तीर्थपुरी यांच्यासह बचत गटाच्या काही महिलांकडे आठदिवसांपूर्वी बाज (खाट) विकणारा एक भामटा आला होता. त्याने तुम्हाला तिरुपती बालाजीचे सव्वा रुपये शेकडा या व्याज दराने एक लाख रुपये मिळवूनदेतो त्यासाठी एक वर्षाचे व्याज 15 हजार रुपये अगोदर जमा करावे लागेल,अशी अट घातली. अत्यंत कमी व्याजाने पैसे मिळतात म्हटल्यावर दहा महिलांनी प्रत्येकी 15 हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. ठरल्याप्रमाणे 11 जून रोजी दहा महिला व काही पुरुष जिपमधून जालना येथे गेल्या शिवाजी पुतळापरिसरात भामट्याची भेट झाली. भामट्याने महिलांकडून व्याजाचे दीड लाखरुपये घेत तुम्ही येथेच थांबा असे म्हणून तो शिवाजी पुतळा परिसरातील बँकऑफ बडोदाच्या शाखेत गेला. तेथे अगोदर उपस्थित असलेल्या भामट्याचा साथीदारांजवळ एक गाठोडे होते. ते गाठोडे त्याने महिलांच्या हातात देत यात आठ लाख रुपये आहेत. माझ्याकडे व्याजाने पैसे देण्याचे लायसन नाही, त्यामुळे तुम्ही हे घेऊन लवकर निघा असे सांगितले. महिलांसोबतच्या पुरुषांना त्याच्या हालचाली व बोलण्याचा संशय आल्याने त्यांनी गाठोडे सोडून पाहण्याचा प्रयत्न केला. गाठोड्यात डबल गाठोडे, त्यात प्लास्टिक पिशवी असे पक्के बांधलेले होते ते सोडून पाहिले असता त्यात लहान मुलांच्या खेळण्याच्या नकली नोटांचे बंडले आढळली. आपले बिंगफुटण्याच्या आधी तेथून सटकण्याच्या तयारीत असलेल्या भामट्याला महिला व पुरूषांनी पकडून ठेवले. दुसऱ्या दिवशी त्याला गोंदी पोलीस ठाण्यात नेऊन त्याच्यावर कलम 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या