प्रेयसीसाठी गरोदर पत्नीची केली हत्या, नवरा अटकेत

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

प्रेयसीशी लग्न करण्यासाठी एका नराधम नवऱ्याने त्याच्या सहा महिन्यांच्या गरोदर पत्नीची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील रबाळे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या नवऱ्याला अटक केली आहे. अखिलेश गुप्ता (२८) असे त्या नराधम नवऱ्याचे नाव आहे. अखिलेशच्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्या सांगण्यावरूनच अखिलेशने पत्नीला बेदम मारहाण केली.

अखिलेश गुप्ता व त्याची पत्नी ममता गुप्ता (२४) यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन वर्षाची मुलगी असून ममता सहा महिन्यांची गरोदर होती. अखिलेशचे गेल्या काही महिन्यांपासून त्याच्याच सोसायटीत राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्याला त्या मुलीशी लग्न करायचे होते. ममताला देखील त्यांच्या प्रेमसंबंधाविषयी समजले होते. त्यावरून त्या दोघांची भांडण देखील व्हायची. सोमवारी अखिलेश व त्याची प्रेयसी त्यांच्या घरी आले व अखिलेशने ममताला मारहाण केली आहे. या मारहाणीमुळे गर्भवती असलेल्या ममताचा रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर तो मुलीला घेऊन घराबाहेर गेला व त्याने प्रेयसीला आतून कडी लावून मागच्या दाराने पळून जाण्यास सांगितले. हा सगळा प्रकार त्यांची दोन वर्षांची मुलगी बघत होती. त्यानंतर थोड्या वेळाने अखिलेश घरी परतला व त्याने बायको दरवाजा उघडत नसल्याता कांगावा केला. त्यानंतर तो आणि काही शेजारी मागच्या दरवाज्याने घरात गेले तेव्हा ममता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यानंतर ममताला रुग्णालात नेण्यात आले पण तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे ममताचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता त्यांना अखिलेशच्य़ा मोबाईलमधून तो सतत एका १६ वर्षाच्या मुलीच्या संपर्कात असल्याचे समजले. त्यानंतर अखिलेशची चौकशी केली असता त्याने ममताला मारल्याचे कबूल केले. त्य़ानंतर अखिलेशच्या प्रेयसीला देखील ताब्यात घेण्यात आले असून तिला भिवंडीच्या ज्युवेनाईल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. असे रबाळे एमआयडीसीचे पोलीस अधिकारी चंद्रकांत काटकर यांनी सांगितले.