सावत्र मुलींवर बलात्कार करणाऱ्या बापाला अटक

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील सांगवी भागात एका नराधम बापाने त्याच्या तीन सावत्र मुलींवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या नराधन बापाला अटक केली आहे. या तीन मुलींपैकी दोन मुली अल्पवयीन असल्याने आपोरी वडिलांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळे गुरव भागात राहणाऱ्या एका महिलेला १८, १५ आणि १३ वर्षांच्या तीन मुली आहेत. ही महिला सरकारी कार्यालयात चतुर्थ श्रेणी कामगार म्हणून कामाला आहे. २००९ साली या मुलींच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तीन वर्षांनी या मुलींच्या आईने एका बॅण्ड वाजविणाऱ्या व्यक्तीशी लग्न केले. या लग्नामुळे आपल्याला वडिलांचे प्रेम मिळेल या आशेवर असलेल्या या मुलींना त्यांच्या वडिलांच्या वागण्याने धक्काच बसला. लग्नानंतर वर्षभर चांगले गेले पण दोन वर्षापूर्वी त्या नराधमाने त्याचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली.

एके दिवशी मुलींची आई कामाला गेल्यावर त्याने मोठ्या मुलीला घरात थांबायला सांगून इतर दोघींना बाजारात पाठवले. त्यानंतर त्याने मोठ्या मुलीवर बलात्कार केला व तिचे अश्लिल फोटो काढले. हे फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला गप्प राहण्यास सांगितले. असाच प्रकार त्याने दुसऱ्या मुलीसोबत देखील केला. गेली दोन वर्ष तो या दोघींवर बलात्कार करत आहे. काही दिवसांपूर्वी त्या नराधमाने लहान मुलीवर बलात्कार केला. या मुलीने याबाबत आईला सांगितले. हे सर्व ऐकून आईला धक्काच बसला व त्यानंतर दोघींनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर दोन्ही मोठ्या मुलींनी देखील त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली असून पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर आयपीसी कलम ३७६, ३५४, ५०६ या अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.