भयंकर! कंबरेपासून तुटला तरी जिवंत राहिला, पण..

सामना ऑनलाईन। धुळे

एका तरुणाने स्वत:ला मालगाडी खाली झोकून दिल्याने त्याच्या शरीराचे अक्षरश दोन तुकडे झाले. तरीही तो काही सेकंदापर्यंत जिवंत होता. त्याच तुटलेल्या अवस्थेत त्याने पोलिसांना आपले नाव व पत्ताही सांगितला. त्यानंतर मात्र त्याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना सोमवारी नंदुरबारमध्ये घडली आहे. संजय मराठे (३९) असे त्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

संजय रिक्षाचालक होता. येथील माळीवाड्यात तो राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो निराश होता. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तो नंदुरबार रेल्वेस्थानकावर आला. रेल्वेस्थानकावर तुरळक गर्दी बघून तो प्लॅटफॉर्मच्या कडेला येऊन गाडीची वाट पाहू लागला.त्याचवेळी त्याला मालगाडी येताना दिसली. काही कळण्याच्या आतच संजयने मालगाडी जवळ येताच स्वतला गाडीखाली झोकून दिले. गाडी त्याच्या अंगावरुन गेली. त्यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले.

मालगाडी जाताच रेल्वस्थानकावर असलेल्या एस. एस. आय. गोविंद काळे व पोलीस कॉन्स्टेबल पुरूषोत्तम खिरटकर यांचे लक्ष रुळावर तुकडे होऊन पडलेल्या संजयकडे गेले. त्यांनी ताबडतोब तेथे धाव घेतली. त्यावेळी संजय जिवंत असून हालचाल करत असल्याचे त्यांना दिसले. रुळावर पालथ्या पडलेल्या संजयला त्यांनी सरळ केले. त्याचे नाव व पत्ता विचारला. त्यावर संजयने पोलिसांना सर्व माहिती दिली. पण दुसऱ्याच सेकंदाला त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी संजयच्या कुटुंबीयांना कळवले.