नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

विदर्भातील तीन जिह्यांतील 13 लोकांचा बळी घेणाऱ्या सिटी – 1 या नरभक्षक वाघाला अखेर बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आले. जवळपास आठवडाभरापासून वन विभागाच्या दोन टीम त्याच्या मागावर होत्या. आज  सकाळी झालेल्या या कारवाईने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

या वाघाने गडचिरोलीच्या देसाईगंज जवळच्या वळूमाता प्रक्षेत्रातील एका गाईवर दोन दिवसांपूर्वी हल्ला करून तिला मारले होते. त्यामुळे तो त्या ठिकाणी पुन्हा येणार याची खात्री असल्याने वन विभागाची ताडोबा येथून बोलावलेला चमू त्याच्यावर पाळत ठेवून होता. जवळच वाघासाठी शिकार म्हणून (बेट) दुसरी एक गायही ठेवली होती. अखेर आज सिटी वन त्या सापळ्यात अडकला आणि टप्प्यात येताच शूटर टीमने त्याच्यावर डार्ट डागला (बेशुद्धीचे इंजेक्शन) अशी माहिती वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी दिली. या वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाणार आहे.