तरुणाच्या पोटातून निघाले १५० लोखंडी खिळे, २६३ नाणी!

प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्यप्रदेशच्या रीवा जिल्ह्यात एक अजब घटना घडली आहे. एका तरुणाच्या पोटातून १५० लोखंडी खिळे, २६३ नाणी, कुत्र्याला बांधण्यासाठी वापरण्यात येणारी स्टीलची एक साखळी, सेफ्टी पिन्स यासारख्या भयंकर गोष्टी काढण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाला अशाप्रकारच्या विचित्र गोष्टी खाण्याची आवड होती.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाला नैराश्याने ग्रासले होते. या आजारांमुळेच त्याला धातूच्या वस्तू खाण्याची सवय झाली होती. मात्र त्याच्या कुटुंबाला त्याच्या या वाईट सवयीबद्दल अजिबातच माहिती नव्हती. जेव्हा पोट खूप दुखायला लागलं तेव्हा तरुण डॉक्टरांकडे गेला. एका स्थानिक डॉक्टराने त्याला टीबी असल्याचं सांगून त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र जेव्हा ६ महिन्यानंतरही उपचाराचा काहीच फायदा झाला नाही. तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याला एका चांगल्या रूग्णालयात नेले. या तरुणाचे एक्स रे काढल्यानंतर ते पाहून डॉक्टरही हैराण झाले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा लोकांची मानसिक स्थिती ठीक नसते तेव्हा लोक अशी असामान्य कृत्य करायला सुरुवात करतात. कोणालाही काहीही न सांगता गेल्या वर्षभरापासून हा तरुण देखील धातूच्या वस्तू खात होता. त्यामुळे त्याची शस्त्रक्रिया करणं अतिशय जोखमीचं काम होतं पण डॉक्टरांसमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. शस्त्रक्रियेनंतर तरुणाच्या पोटातून एकूण २००० रुपयाची १,२ आणि ५ रुपयांची नाणी काढण्यात आली. याशिवाय २ किलो वजनाचा धातू आणि कुत्र्याला बांधण्यासाठी वापरण्यात येणारी एक साखळीही त्याच्या पोटात सापडल्याची माहीती डॉक्टरांनी दिली.