उत्तरप्रदेशात कैद्याच्या मृत्यूनंतर त्याला मिळाला जामीन

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद शहरात एका आरोपीला त्याच्या मृत्यूच्या चार तासानंतर जामीन मिळाल्याची अजब घटना उघडकीस आली आहे. दालचंद मौर्य असे त्या आरोपीचे नाव असून त्याचा मुरादाबाद तुरूंगात गुरूवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

सप्टेंबर २०१६ मध्ये दालचंद मौर्य यांनी त्यांचे तीन नातेवाईक विजय पाल, उमेश सिंग, जोगिंदर यांच्या मदतीने चंदौसी येथे राहणाऱ्या राम प्रसादवर गोळीबार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी या चौघांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर सत्र न्यायालयात खटला सुरू होता. याप्रकरणात मौर्य यांना जामीन मिळावा म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २५ जानेवारी रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना जामिन मंजूर केला होता. मात्र या आदेशाची प्रत तुरूंग प्रशासनाला न मिळाल्याने मौर्य यांची सुटका नव्हती झाली. मात्र जामिनावर सुटका होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

दालचंद मौर्य यांना सकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना तुरूंगातील रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृ्त्यूनंतर चार तासांनी आम्हाला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे पत्र मिळाले ज्यात मौर्य यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश देण्यात आले होते, असे तुरूंग अधिक्षक राजेंद्र सिंह यांनी सांगितले.