त्याच्या पँटमध्ये अजगर बघून पोलीसही घाबरले

सामना ऑनलाईन । बर्लिन

वर्दीतला पोलीस मामा समोर आला की भल्याभल्यांची बोलती बंद होते. पण जर्मनीत एका सामान्य नागरिकाला पोलीस घाबरल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. पोलीस एवढे घाबरले की सामान्य नागरिकापासून लांब पळू लागले. कारण प्रकारच एकदम विचित्र घडला होता.

झाले असे की, मंगळवारी डरमस्टॅड पोलिसांना फोन आला. फोन करणाऱ्या महिलेने तिच्या घराजवळ दोन व्यक्ती जोरजोराने भांडत असल्याने खूप त्रास होत असल्याचे सांगितले. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. तिथे दोघेजण भांडत होते. भांडणाऱ्यांपैकी एक पस्तिशीचा होता तर दुसरा १९ वर्षांचा तरुण. दोघे दारुच्या नशेत होते. पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दोघांना निघून जाण्यास सांगितले. मात्र नशेत असल्यामुळे दोघेही पोलिसांचे म्हणणे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर पोलिसांनी दोघांना हात बांधून दूर नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तरुणाने खिशात काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सुरू केला. संशय आल्यामुळे एका पोलिसाने त्याच्या खिशातच हात घातला. खिशात हात घालताच पोलिसाला हातात काहीतरी वळवळल्यासारख जाणवले. त्याने ते झटकन बाहेर खेचून काढताच आतून १४ इंचाचे एक अजगराचे पिलू बाहेर आलं. ते बघून पाचावर धारण बसलेल्या त्या पोलिसाने लांब उडी घेत स्वतःला अजगरापासून दूर केले. त्याचवेळी दुसऱ्या एका पोलिसाने त्या अजगराला पकडले व एका खोक्यात बंद केले.

आपण प्राणीविषयक कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. दरम्यान त्याला अटक करण्यात आली असून अजगराची रवानगी एका प्राणीसंग्रहालयात करण्यात आली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.