मामाची गर्लफ्रेंड पटवण्याचा भाच्याचा प्रयत्न, मामाने केली निर्घृण हत्या

murder

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मामाच्या घरात राहून त्याचीच गर्लफ्रेंड पटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. मामानेच भाच्याची हत्या केल्याचं उघड झालं असून मामाला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव बिजय कुमार महाराणा असे आहे. बिजय कुमारने त्याचा भाचा जय प्रकाश याची पंख्याच्या मोटरने ठेचून हत्या केली होती व त्यानंतर त्याचा मृतदेह घराच्या बाल्कनीत पुरला होता.

2015 मध्ये बिजय कुमार हा कामानिमित्त त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिल्लीला स्थायिक झाला होता. त्यानंतर जयप्रकाश देखील तिथे राहायला आला. ते तिघे एकाच फ्लॅटवर राहत होते. जयप्रकाश बिजय कुमारच्या गर्लफ्रेंडसोबत फ्लर्टींग करायचा. त्यांची वाढती जवळीक बघून बिजय कुमार वैतागला होता. त्यामुळे त्याने एक दिवस जयचा काटा काढायचा ठरवले. त्यानुसार एक दिवस बिजयची गर्लफ्रेंड घरात नसताना त्याने गाढ झोपलेल्या जयप्रकाशच्या डोक्यावर पंख्याच्या मोटरने वार केला व ठेचून ठार मारले. जयप्रकाश मेल्याची खात्री झाल्यानंतर विजयने त्याचा मृतदेह घराच्या बाल्कनीमध्ये पुरला आणि वर फुलझाडं लावली. हत्येचा एकही पुरावा मागे राहू नये म्हणून बिजयने घर देखील व्यवस्थित साफ केले. जयप्रकाशला मारल्यानंतर तीन दिवसांनी बिजय स्वत:च पोलीस ठाण्यात गेला व त्याने जयप्रकाश बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदविली. त्यानंतर काही महिन्यांनी बिजय कुमारने ते घर सोडले व तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दुसरीकडे राहू लागला.

गेल्या दोन वर्षात त्या घरात दोन भाडेकरू राहून गेले. मात्र जय प्रकाशच्या मृत्यूचा उलगडा होऊ शकला नाही. सप्टेंबर महिन्यात त्या घराच्या मालकाने घरात काही रिपेरिंगचे काम काढले. त्यावेळी घराच्या बालकनीत एक मानवी सांगाडा व निळ्या रंगाचे जॅकेट सापडले. याबाबत घरमालकाने तत्काळ पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना दोन वर्षापूर्वी त्याच घरात राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांकडे त्याचा भाचा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली असल्याचं कळालं. बिजयने तक्रार नोंदवतेवेळी पोलिसांना त्याचा नंबर दिला होता. पोलिसांनी या नंबरवर संपर्क साधला मात्र बिजयने तो नंबर बंद करून टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी जवळपास तीन महिने कसून तपास करत बिजय कुमारला हैदराबाद येथून अटक केली.