प्रेयसीची हत्या करून प्रियकराचीही आत्महत्या

2

सामना ऑनलाईन । नगर 

प्रेयसी बरोबर झालेल्या भांडणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने सपासप वार करून हत्या केली. तिच्या हत्येनंतर प्रियकारनेही स्वत:च्या हाताची नस कापुन आत्महत्या केली. अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपूरमधील शिरसाठ रुग्णालय परिसरात घटना घडली आहे. निता गोर्डे (40) आणी गणेश दळवी (30) अशी मृतांची नावं आहेत.

श्रीरामपूर येथील वार्ड नंबर एक मधील अडसुळ गल्लीत निता आणि गणेश दोन महिन्यांपूर्वी राहण्यासाठी आले होते. शनिवारी दुपारी दोघांमध्ये शुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. भांडण सुरू असताना निता घरात होती, त्यावेळी गणेश दरवाजावर लाथ मारून घरात घुसला. त्यानंतर, सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास घरातून आवाज येणे बंद झाल्याने शेजारी राहणाऱ्या महिलेने निताला आवाज दिला. मात्र निताचा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा तिने दरवाजा उघडून घरात बघीतले असता, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. निताच्या गळ्यावर गणेशने धारदार शस्त्राने वार केले होते. आणि नंतर स्वतःच्या अंगावरही चाकूचे वार करून व हाताची नस कापून घेत आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या प्रकरणी श्रीरामपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.