कोब्रानं फुस्सsss केलं, तरुणाने सापाशी लग्न करुन टाकलं

सामना ऑनलाईन । सिंगापूर

एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना सिंगापूरमध्ये घडली आहे. आपली प्रेयसी सापाच्या रुपात परत आली आहे असा ठाम विश्वास असलेल्या तरूणाने चक्क सापाशी लग्न केलं आहे. लग्न झालेला पुरुष पत्नीसोबत जसा राहतो तसा हा तरुण या सापासोबत राहतो. त्याला सापाच्या रुपात प्रेयसी परत आल्याचा साक्षात्कार कुठून झाला हे मात्र कळू शकलेलं नाही. मात्र नागपत्नीसोबत फिरणारा हा तरुण सिंगापूरमध्ये भलताच प्रसिद्ध झाला आहे.

सात वर्षांपूर्वी या तरुणाच्या प्रेयसीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूमुळे या तरुणाला जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. आपली प्रेयसी मेली नसून ती एकदिवस परत येईल असा आंधळा विश्वास या तरुणाला वाटत होता. बराच काळ लोटल्यानंतरही प्रेयसी परत न आल्याने तो मानसिकदृष्ट्या खचला होता. एकेदिवशी त्याला एका जंगलात कोब्रा जातीचा साप दिसला. या कोब्राच्या रुपात आपली प्रेयसीच आली आहे असं त्याला या सापाला बघता क्षणीच वाटायला लागलं. यामुळे या तरुणाने हा कोब्रा घरी आणला आणि त्याच्याशी लग्न केलं. कोब्रा जातीचा साप हा अत्यंत जहरी असतो. त्याने दंश केल्यास काही मिनिटांमध्येच माणसाचा मृत्यू होतो. मात्र घरी आणल्यापासून या सापाने आपल्याला एकदाही चावा घेतलेला नाही असं या तरुणाचं म्हणणं आहे. यामुळे हा कोब्रा म्हणजे आपली प्रेयसीच असून तिने पुनर्जन्म घेतल्याचं या तरुणाला वाटतंय.