डोक्यात कुकर घालून शिक्षिकेची हत्या

सामना ऑनलाईन । डोंबिवली

आपल्या आईसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून एका मुलाने शिक्षकेच्या डोक्यात कुकर घालून तिची हत्या केल्याची घटना डोंबिवली पश्चिम परिसरात घडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी रोहित लक्ष्मण तायडे याला पोलिसांनी अटक केली असून मनिषा जयवंत खानोलकर(६०) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने डोंबिवली परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव येथील ओम पुरुषोत्तम अपार्टमेंटमध्ये मनिषा खानोलकर गेल्या १७ ते १८ वर्षापासून एकट्या राहत होत्या. मनिषा आपल्या फ्लॅटमध्ये काही विद्यार्थ्यांचे शिकवण्या चालवत असत. गेल्या आठवड्यात काही कारणावरून मनिषा व रोहित तायडे याच्या आईचे जबरदस्त भांडण झाले होते. रोहित तायडेच्या आईला मनिषा यांनी शिवीगाळ केल्याने तो संतापला होता. हाच राग मनात ठेवून रोहितने शनिवारी मनिषा यांच्या डोक्यात कुकरने घालून वार केला. हा वार इतका जबरदस्त होता की, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रविवार सांयकाळी ४ च्या सुमारास काही विद्यार्थी शिकवणीसाठी आले असता हा सर्व धक्कादायक प्रकार सर्वांसमोर आला. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मनिषा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.