धक्कादायक! भोकरमध्ये नराधम बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, नांदेड

आठवीत शिक्षण घेत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर भोकर मध्ये जन्मदात्या बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या नराधम बापाविरुद्ध भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकर तालुक्यातील एका गावात पीडिता आपल्या आई वडिलांसह राहते. तिच्या आईची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा फायदा तिचा बाप घेत असे. गेल्या दोन तीन महिन्यांपासून पीडितेवर त्याची वाईट नजर होती. तो तिला चुकीच्या पद्घतीने स्पर्शही करत असे. त्यावरून पीडितेच्या आईने त्याला जाबही विचारला होता. मात्र, तो त्याला बधला नाही. 1 मार्च रोजी रात्री घरातच या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर तिची आई जागी झाली आणि तिने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, चाकूचा धाक दाखवून त्या नराधमाने या प्रकाराची कुठेही वाच्यता न करण्याबद्दल दोघींनाही धमकावले.

जिवाच्या भीतीने दोघीही गप्प बसल्या. मात्र, काही दिवसांनी पीडितेला त्रास होऊ लागल्याने तिने या सर्व प्रकाराबाबत तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितले. तिचे बोलणे ऐकून हादरलेल्या मुख्याध्यापिकेने मुलीच्या आजी-आजोबांना या प्रकाराची कल्पना दिली. आजी-आजोबांच्या मदतीनेच पीडितेने पोलीस ठाण्यात बापाविरुद्ध तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.