सरकारने माझा खून केला म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या


सामना प्रतिनिधी । रत्नपूर

तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील उच्चशिक्षित तरुणाने मंगळवारी मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘मी केलेली आत्महत्या नसून सरकारने केलेला हा खून आहे’ अशी सुसाईड नोट या तरुणाने लिहून ठेवली होती. किशोर शिवाजी हारदे (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील किशोरचे शिक्षण बी.एस्सी, आय.टी.आय. झाले होते. तो येवला येथे एका फायनान्स कंपनीत काम करत असे. काही दिवसांपूर्वी तो पोळा सणासाठी गावाकडे आला होता. आरक्षण नसल्यामुळे आपल्याला सरकारी नोकरी मिळत नाही, असे तो मित्र व नातेवाईकांना सांगत असे. त्यामुळे तो निराश होता. काल सर्व मित्रांना भेटला. पण त्याने कोणालाही काही सांगितले नाही. पण सतत आरक्षणाविषयी चर्चा करायचा. मराठा आंदोलनात तो नेहमी हजर राहायचा. तसेच काल त्याने आपल्या मोबाईल स्टेटसवर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचा मित्र बनून राहील. विसरलो तर समजून जा, देवाची आणि माझी मैत्री झाली… आणि मंगळवारी सकाळी ‘गुड बाय’ असे स्टेटस टाकले. त्यानंतर तो शेतात चाललो असे घरी सांगून मोटारसायकल घेऊन गेला. पण गाडी बैलाच्या गोठ्याजवळ उभी करुन गेट नं. २७३ मधील स्वत:च्या शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्याचे समजताच गल्लेबोरगाव बाजारपेठ बंद करण्यात आली. रत्नपूर तहसील कार्यालयात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. घोषणाबाजी करत तहसीलसमोर आंदोलन सुरू केले. जोपर्यंत प्रशासन लेखी स्वरुपात दखल घेत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार व किशोर हारदे याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मराठा समाजबांधवांनी घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत व नोकरीचे लेखी आश्वासन आंदोलकांना दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार हर्षवर्धन जाधव, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी संतोष माने, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, विलासराव चव्हाण, जगन्नाथ खोसरे, दीपक खोसरे, भीमराव खंडागळे, संजय भागवत यांची उपस्थिती होती. प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार राहुल गायकवाड होते. उपविभागीय अधिकारी राजगुरू, पोलीस निरीक्षक हरीश खडेकर यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला.