गाडीसमोर ५१० रुपये फेकले आणि दहा लाखांचे हिरे पळविले

सामना प्रतिनिधी । मुंबई

कार स्पार्कनंतर मुंबईत आता पैसा फेकू टोळी सक्रिय झाली आहे. गिरगाव परिसरात या टोळक्याने ५१० रुपये गाडीसमोर फेकले आणि गाडीतील दहा लाखांचे हिरे पळविले. तर बोरिवलीमध्ये गाडीतील पिस्तूल आणि दीड लाख रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाले. याप्रकरणी डी. बी. मार्ग आणि समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरगाव येथील पंचरत्न इमारतीजवळ उभ्या असलेल्या सफेद रंगाच्या फॉर्च्युनर कारला चार ते पाच जणांनी घेरले. १०-२० रुपयांच्या सुमारे ५१० रुपयांच्या नोटा गाडीच्या आजूबाजूला टाकल्या. चालकाला तुझे पैसे पडले आहेत असे सांगून खाली उतरण्यास भाग पाडले. यादरम्यान मागच्या सीटजवळील दरवाजा उघडून गाडीतील बॅग घेऊन पसार झाले. ही गाडी एका हिरे व्यापाऱयाची असून बॅगमध्ये १० लाखांचे हिरे होते, अशी तक्रार डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात केली आहे.

दुसरी घटना बोरिवलीत घडली असली तरी याबाबत समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक गाडीत बसला असताना काही जणांनी पैसे पडल्याचे सांगून त्याचे लक्ष विचलीत केले. काही कळण्याआधीच गाडीत ठेवलेली बॅग चोरटय़ांनी पळवली. काही तासांनंतर चालक आणि गाडी मालकाच्या ही घटना लक्षात आली. गाडी मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार या बॅगेत पिस्तूल आणि दीड लाखाची रोकड होती. यासंदर्भात पुढील कारवाई सुरू असल्याचे समतानगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले.