‘नाक’काप्या छगन महाराजला २३ वर्षांनंतर अटक

विजय जोशी, नांदेड
बायकोचे नाक कापून फरार झालेल्या आणि पोलिसांना ओळखू येऊ नये म्हणून छगन महाराज बनलेल्या आरोपीला पोलिसांनी तब्बल २३ वर्षांनंतर अटक केली आहे. बायकोचे नाक कापल्यानंतर फरार झालेला नामदेव येडे हा फरार झाला आणि माहूर गडावर वेशभूषा बदलून छगन महाराज म्हणून राहू लागला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली.

नामदेव येडे हा बायको आणि मुलासह भोकरमधल्या शास्त्रीनगरात राहात होता. एकेदिवशी त्याने बायकोला घरी आल्यानंतर मारहाण करायला सुरुवात केली, तू मेव्हण्याच्या शेतात कामाला का गेलीस असं विचारत त्याने ही मारहाण केल्याचं पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. तुला मुदखेडला सोडतो असं सांगत रागाने बायकोला २३ नोव्हेंबर १९९४ रोजी भोकर रेल्वे स्थानकावर नेलं. स्थानकापासून काही दूर नेत नामदेवने बायकोला पुन्हा मारहाण केली आणि शस्त्राने तिचं नाक कापलं. यानंतर वेदनेने विव्हळत असलेल्या बायकोला तसंच सोडून देत त्याने पळ काढला होता. इतक्या वर्षांनंतर नामदेवला ओळखणं बरंच अवघड होतं, कारण त्याने त्याचा वेष बदलला होता, आणि वृद्धत्वामुळे तो पटकन ओळखू येत नव्हता. मात्र भोकर पोलिसांनी अत्यंत कुशलतेने काम करत नामदेव उर्फ छगन महाराजला अटक केली.