बाप्पाचा सोहळा…

मानसी इनामदार, ज्योतिषतज्ज्ञ

उद्यापासून माघातील बाप्पाच्या उत्सवास सुरुवात होते आहे. चला सारे मिळून बाप्पाची मानसपूजा करूया

आजपासून माघ महिन्यातील गणेशोत्सव सोहळ्यास सुरुवात होते. महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय देवबाप्पा. आपल्या आवडत्या व्यक्तीचा, दैवताचा वाढदिवस आपण कितीही वेळा साजरा करू शकतो. किंबहुना प्रत्येक मराठी माणसासाठी ती एक पर्वणीच aअसते. महाराष्ट्राची, मराठी मातीची ही दोन परमप्रिय दैवतं छत्रपती शिवराय आणि गणपती बाप्पा… त्यांचे वाढदिवस साजरे करणे म्हणजे मराठी जनांसाठी तो एक आनंद सोहळा असतो. बाप्पाचे तीन वाढदिवस येतात. कारण त्याने दृष्ट शक्तींच्या निर्दालनासाठी तीनवेळा अवतार घेतला.

 पहिला अवतार

वैशाख शुक्ल पौर्णिमा. यास पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते.

दुसरा अवतार

भाद्रपदातील गणेश चतुर्थी. या दिवशी पार्थिव गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजाच असते. भाद्रपदात शेतात धान्य पिकत असते. त्याप्रती कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.

तिसरा अवतार

माघ शुक्ल जयंती. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसास ठार केले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक म्हणून अवतार धारण केला. या दिवशी उपवास करून गणेशाला तीळ आणि साखरेचे मोदक करून नैवेद्य दाखवायचा असतो. उपवास करून जागरण करायचे असते. म्हणूनच या गणेश जयंतीला अनेक प्रबोधन आणि करमणूकपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

> या दिवशी घरातील गणेश प्रतिमेचे पूजन करावे. अथर्वशीर्षाचे पठण करावे. अथर्व याचा अर्थ स्थीर राहणे.

> या तिथीला गणेशतत्त्व नेहमीपेक्षा सहस्त्र पटींनी कार्यरत असते. त्यामुळे अथर्वशीर्षाच्या आवर्तनातून निघणाऱया स्वरलहरींचा सकारात्मक परिणाम होतो.

> गणपती हा दिशांचा अधिपती आहे. अथर्वशीर्षाच्या आवर्तनांनी या दिशांतून सकारात्मक ऊर्जा प्रसवते.

> सातत्याने अथर्वशीर्ष म्हटल्याने वाणीत चैतन्य येते.

> उच्चार स्पष्ट आणि शुद्ध होतात.

> आपण ज्या भाषेत बोलतो ती नादभाषा आहे. त्यामुळे वाणीत माधुर्य निर्माण होते.