गणपती … कृष्ण…

मानसी इनामदार, ज्योतिषतज्ञ

कृष्ण आणि गणपतीआपल्या सगळ्याच्या हृदयातील दोन छानसे देव. आपल्या रोजच्या सुखदु:खात सहज रममाण होणारे..

आज संकष्टी चतुर्थी… आणि दोन दिवसांनी कृष्णजन्म… आपल्या अनेक देवतांपैकी ही दोन महत्त्वाची दैवतं. कृष्ण आणि गणपती बाप्पा… मानवी भावभावनांशी हे दोघंही अत्यंत समरसलेले… किंबहुना मानवी जगणं हाच दोघांच्या अध्यात्माचा पाया… माणसांमध्ये या दोघांना प्रचंड रस… आपली सुखदुःखं… रोजच्या जगण्यातील अडीअडचणी सगळ्यात ही दोघंही डोकावतात.

दोघंही कलेची आराध्य… एक 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती… तर दुसऱयाच्या श्वासात… ध्यासात… अभिव्यक्तीत निरंतर कलेचा वास.

बाप्पा अयोनिज… किती सुंदर शब्द आहे हा! तो पार्वती आईच्या उदरातून नव्हे तर अत्याधुनिक विज्ञानातून जन्मून त्याने आपली विज्ञाननिष्ठता अगदी ठामपणे सिद्ध केलेली.

कृष्णाला मात्र जन्माच्या प्रत्येक आंदोळणातून जायला मनापासून आवडले. देवकी मातेचे डोहाळे, तिच्या प्रसववेदना… तिचा विरह सारे सारे या सावळ्या परब्रह्माने समरसून अनुभवले. या त्याच्या प्रत्येक जगण्याच्या टप्प्यातून प्रतिकुलतेला हसत हसत सामोरे कसे जायचे हे तो त्याच्या प्राणप्रिय बासरीच्या सुरावटीवर ध्यानमग्न होऊन सांगत राहातो.

बासरी… त्याची परमप्रिय बासरी… आणि त्याचे प्राणप्रिय गोधन. या दोहोंमधून तो सहज अभिव्यक्त होत राहातो… निःशब्द शांततेत… आसमंत पुरून उरलेलं असतं ते त्याच्या वेणूतील स्वर्गीय संगीत. ही त्याची सुरांची भाषा समजते ती त्याच्या हृदयाजवळ असणाऱया गायी-वासरांना… आणि त्याच्यावर निरपेक्ष… निस्सीम प्रेम करणाऱया भक्तांना… म्हणूनच बहुधा कृष्ण सहज सांगून जातो…

ना हं वसामि वैकुंठे।

योगिनां हृदये रवो।

मद्भक्ता यत्र गायन्ती।

तत्र तिष्ठा मिनारदा।।

चार ओळींचा श्लोक. पण सारे अध्यात्म त्याने या चार ओळींत सांगितलेले. वैकुंठात त्याचा वास नाही… योगीजनांच्या हृदयातही नाहीच… जिथे त्याच्यावर प्रेम करणारे भक्त राहतात… त्याच ठिकाणी त्याचे कायम वास्तव्य असते.

कर्मयोग आणि प्रेमयोग याची अद्भुत सांगड कृष्ण घालतो. रुक्मिणी… सत्यभामा पत्नीपद भूषवत असतानाही सारी कर्तव्यं पार पाडत त्याच्या हृदयात विरामजमान आहे ती राधा… त्याच्या प्राणप्रिय बासरीसह… कारण जेव्हा तो गोकुळातून मथुरेला निघाला तेव्हा राधेने त्याची बासरी काढून घेतली… आणि त्यानंतर पुन्हा राधा भेटेपर्यंत त्यानेही बासरी हाती धरली नाही.

बाप्पाचे वागणे एकदम सरळ… सोपे… स्वतःतील बाल्य त्याने कायम जपून ठेवले आहे… जास्वंदीच्या फुलागत… प्रसन्न टवटवीत… त्याच्या पार्वती आईसाठी तो कायमच लहान… लाडोबा… तसे पाहता आईला आपली सगळी मुले सारखीच… पण ज्यामध्ये थोडे वैगुण्य असते, कमी असते त्या लेकरावर आईची विशेष माया… कारण जगाने नाकारले तर… आपल्या लेकराचे कसे होईल ही भीती तिच्या ‘आई’च्या हृदयाला ग्रासलेली असते. आईसोबतच हे पोरपण बाप्पा अगदी मनसोक्त अनुभवतो.

लाडोबा असूनही युक्ती, शक्ती, विद्या, कला यात कुठेही तो कमी पडत नाही. उलट या साऱयाजणी त्याच्यापुढे नतमस्तक… आयुष्य छान आहे. ते हसत जगावं… लहान मूल होऊन कोड पुरवून घ्यावेत… प्रसंगी आपले कर्तृत्त्व अगदी सहज सिद्ध करावे… छान छान पदार्थांचा, विशेषतः राजस मोदकांचा आस्वाद घ्यावा. नेहमी हसत राहावे… डोळस भक्ती, डोळस श्रद्धा… जीवनावर अखंड प्रेम ही बाप्पाची आवडती सूत्रं.

कृष्ण आणि गणपती… आपल्यात समरसलेली… त्यांनी सांगितलेले सोपे तत्त्वज्ञान आपणही खऱया अर्थाने अमलात आणले तर उगाच खूप अवघड वाटणारे आपले जगणे असेच सुगंधी, सुंदर, मोदमय होऊन जाईल… नाही का…