माणदेशी सफर

४ ते ७ जानेवारी मुंबईत माणदेशी महोत्सव भरणार आहे. त्यानिमित्ताने ही माणदेशी सफर.

माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्य, चटकदार चटण्या व ठसकेदार मसाले, कुरकुरीत पापड, तोंडाची चव वाढवणारं आंबट तिखट लोणचं, माणदेशी घोंगडी, दळण्यासाठी जाती, खलबत्ते, केरसुण्या, हातमागावरच्या आणि हाताने कलाकुसर केलेल्या शाली, साड्या, दुपट्टे, ब्लाऊज, ड्रेस मटेरियल्स असा अस्सल माणदेशी खजाना मुंबईकरांना पाहता येणार आहे. निमित्त आहे ते माणदेशी फाऊंडेशन संस्थेच्या ‘माणदेशी महोत्सवा’चे.

सातारा जिल्ह्यातील माण हा एक दुष्काळी भाग आहे. या गावातील महिलांना रोजगार मिळावा, त्या स्वावलंबी व्हाव्यात यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. या महिलांची कलाकुसर लोकांपर्यंत पोहोचावी हा यामागचा उद्देश्य… माणदेशी फाऊंडेशनमुळे सक्षम झालेल्या महिलांना मुंबईसारख्या शहरामध्ये हक्काची बाजारपेठ मिळते. त्याने या महोत्सवामध्ये महिलांनी बनवलेल्या व पिकवलेल्या अनेक गोष्टींची विक्री होते. यासाठी दरवर्षी मुंबईत माणदेशी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी तब्बल २० हजार मुंबईकरांनी माणदेशी महोत्सवास भेट दिली होती. या महोत्सवाचा माहोलच पूर्ण माणदेशी असतो. तिथले खाद्य, संस्कृती, परंपरा, पोशाख ही सगळी समृद्धी अगदी जवळून अनुभवता येते.

या महोत्सवाची खासीयत म्हणजे माणदेशी महोत्सवात सुतार, लोहार, कुंभार यांची थेट कला पाहायला मिळणार आहे. स्वतःच्या हाताने मडकं वा लाटणं बनवता येईल. फेटा बांधायलाही शिकता येईल. याबरोबरच चपला तयार करणाऱ्या, दागिने बनविणाऱ्या किंवा कपडे विणणाऱ्या कलाकारांची कला पाहायला मिळणार आहे. याशिवाय माणदेशाची खासीयत असलेले माणदेशी जेन, घोंगडी, दळण्यासाठी जाती व खलबत्ते, केरसुण्या, दुरड्या, सुपल्या हे साहित्य व माणदेशी माळरानातली गावरान ज्वारी, बाजरी, देशी कडधान्ये तसेच चटकदार चटण्या व मसाल्यांची चव चाखता येणार आहे. या महोत्सवात नैसर्गिक गूळ, गूळ पावडर, तीळ, तांदूळ, कडधान्य, गव्हाचे कुरमुरे या गोष्टींना खूप मागणी होते. गेल्या वर्षी १०० टन गूळ विकला गेला होता. या वर्षी माणदेशी महोत्सवात ९० ग्रामीण उद्योजक आपल्या उत्पादनांद्वारे सहभागी होणार आहेत.

फाऊंडेशनविषयी
सातारा जिह्यातील माण तालुका हा महाराष्ट्रातील एक दुष्काळग्रस्त भाग. या भागात जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने मी पूर्णपणे भारावलेली होते. तेथील महिला अशिक्षित असल्याने कोणती बँक त्यांना खाते उघडून देत नव्हती. म्हणून त्या महिलांना एकत्र करून हिंदुस्थानातील पहिल्या महिला सहकारी बॅंकेची स्थापना केली. महिलांना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी ही बॅंक निर्माण झाली, पण या महिलांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी, विक्री, विपणन यांचे ज्ञान मिळावे, त्यांच्या उत्पादन आणि सेवांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. – चेतना सिन्हा, महोत्सवाच्या अध्यक्षा

यंदाचे वैशिष्ट्य
यंदा माणदेशी महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महोत्सवाच्या अध्यक्षा चेतना सिन्हा लिखित ‘छावणी : एक भागीरथी प्रयत्न’ पुस्तक. हे फाऊंडेशन तयार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छावणी. दीड वर्षात १२,९३६ गुरांसाठी आणि ३ हजार कुटुंबांची छावणी फाऊंडेशनने चालवली होती. ते वाचायला मिळेल.

आकर्षण महिला कुस्तीचे
या महोत्सवात माणच्या मातीचं दर्शन घडविणारे खेळ, त्यांचे लोकनृत्य, त्यांचे लोकसंगीत यांचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. खास माण तालुक्यातील गाझी लोकनृत्याचा आस्वाद या महोत्सवादरम्यान घेता येणार असून एका सायंकाळी महिला कुस्त्यांचे आकर्षणही लोकांना आहे.

माणदेशी संस्कृतीचा अनुभव
लोकसंगीत,लोकनृत्य,गाझी लोकनृत्य मुंबईतील लोकांना जवळून कळावे, त्याची ओळख व्हावी व ती संस्कृती जिवंत राहण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे गावाकडील या महिलांना स्वयंरोजगार, व्यवसायवाढीसाठी लागणारा आत्मविश्वास मिळावा यासाठी आम्ही त्यांना मुंबईमध्ये घेऊन येतो.

माणदेशी महोत्सव
माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा ‘माणदेशी महोत्सव’ ४ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सहभागी होणार आहे.