इद्रजाल: जादुई सरकार

>>संजय मिस्त्री

‘नटसम्राट’ नाटकात आप्पा बेलवलकर आपल्या पत्नीला ‘सरकार’ संबोधतात. खरंच, स्त्रियाच ‘सरकार’ चालवत असतात. जगात विविध क्षेत्रांत स्त्रियांनी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे. अशाच एक बंगाली कन्या मनेका सरकार यांचे मुंबईमध्ये जादूचे प्रयोग चालू आहेत. आपले पिता पी. सी. सरकार यांच्यासोबत त्यांचे फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात जादूचे प्रयोग चालू आहेत. जादूचा नऊ पिढ्यांचा वारसा लाभलेल्या या जादुई सरकार कुटुंबाविषयी थोडंसं…

पी. सी. सरकार हे कुटुंब गेल्या नऊ पिढ्या पूर्णवेळ जादूवर उपजीविका करतं. मनेका ही नववी पिढी. आतापर्यंत सरकार कुटुंबात पुरुष मंडळीच जादूचे प्रयोग करीत. पण मनेका ही अमेरिकेतून एमबीएची पदवी घेऊन आलेली तरुणी आपल्या वडिलांचा, आजोबांचा, पणजोबांचा व्यवसाय पुढे नेण्याचे ठरवते आणि पूर्णवेळ हा जादूचा व्यवसाय निवडते.

मनेकाचे वडील पी. सी. सरकार ज्युनियर हे उच्चविद्याभूषित आहेत. त्यांनी मानसशास्त्र, विज्ञान या विषयांत पदव्या मिळवल्या आहेत. एवढंच नव्हे, पीएच.डी. केली आहे. त्यामुळे आपल्या मुलीनेही आपल्याप्रमाणे भरपूर शिकावं अशी आई-वडिलांची इच्छा. घरातल्या जादुई वातावरणाचा परिणाम मुलांवर होणार नाही याची काळजी पी. सी. सरकार दांपत्याने घेतली. दौर्‍यावर असताना स्टेजवर ग्रीन रूममध्ये मनेका सरकार यांच्या आई त्यांना अभ्यास ठरवून देत. एवढा अभ्यास केलास तरच तुला स्टेजवर येता येईल असं सांगत. पी. सी. सरकार यांच्या पत्नीही त्यांच्यासोबत स्टेजवर जादूचे प्रयोग करतात. लहानपणापासून मनेकाने ते पाहिलेले आहे. आईने जादूगाराचा नवीन ड्रेस शिवला की, आपल्यालाही तसाच जादूचा ड्रेस हवा म्हणून मनेका हट्ट करीत असे.

आईच्या ड्रेसची छोटी आवृत्ती मनेकाला द्यावी लागे. अगदी पाच-सहा वर्षांची असल्यापासून मनेका जादूगाराचा ड्रेस घालून वावरे. विंगेमधूनच आपल्या आईवडिलांचा शो बघत असे. एक दिवस स्टेजवर शो चालू असताना संगीत चालू झाले. पी. सी. सरकार दांपत्याचा प्रयोग चालू झाला आणि पाच-सहा वर्षांच्या मनेकाने अचानक स्टेजवर एण्ट्री घेतली व नाचू लागली. प्रेक्षकांना वाटले तो जादूच्याच प्रयोगाचा एक भाग आहे.

प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, पण प्रामाणिक पी. सी. सरकारनी छोट्या मनेकाला उचलून घेतले आणि प्रेक्षकांना सांगितले की, हा जादूच्या प्रयोगाचा भाग नव्हता. मनेकाने उत्स्फूर्तपणे ही एण्ट्री घेतलीय. प्रेक्षकांनी पुन्हा कौतुकाने टाळ्या वाजवल्या. ही मनेका सरकार यांची स्टेजवरची पहिली एण्ट्री.

पी. सी. सरकार स्टेजवर जादूने सिंह निर्माण करीत असत. त्यासाठी त्यांनी सिंह पाळला होता. तो इतका माणसाळलेला होता की, तो सिंह स्वत:ला माणूसच समजत असे. पी. सी. सरकार यांनी घरात आपल्या आरशांना पडदे लावून घेतले होते. तो सिंह घरात इतरांसारखा फिरत असे. पी. सी. सरकार कुटुंबाने प्रेम दिल्यामुळे तो त्यांच्यावरही प्रेम करीत असे. मनेकाचा जन्म झाला आणि तिचे लाड होताहेत हे दिसल्यावर त्या सिंहाच्या नजरेत असुया निर्माण झाली. मनेकाचे लाड करताना दिसले की, त्या सिंहाची नजर असुयापूर्ण होत असे हे पी. सी. सरकार दांपत्याच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांनी त्याला आपल्या बागेतील पिंजर्‍यात बंदिस्त करून ठेवले.

मद्रासला पी. सी. सरकार यांचे जादूचे प्रयोग चालू असताना एके दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आता सिंहाचा जादूचा प्रयोग चालू होणार होता. पी. सी. सरकार वेश बदलण्यासाठी ग्रीन रूममध्ये गेले. तिथे त्यांच्या दुसर्‍या दोन मुलींनी पकडून ठेवले. पी. सी. सरकार यांना वाटले, लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून गंमत केली असेल. सिंहाच्या जादूच्या प्रयोगाचे पार्श्‍वसंगीत सुरू झाले. पी. सी. सरकार मुलींना म्हणाले, ‘सोडा मला, माझी स्टेजवर एण्ट्री घ्यायची वेळ झाली’. पण मुली त्यांना सोडेनात. काही वेळ झाल्यानंतर पी. सी. सरकार यांच्या कानावर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकू आला. त्यांना काही कळेना. म्हणून त्यांनी स्टेजवर डोकावून पाहिले, तर सिंहासोबतचा जादूचा प्रयोग मनेका सरकारने पूर्ण केला होता. पी. सी. सरकारना ते आवडले नाही. त्यांना खूप राग आला, त्यांना न सांगता हिंस्र प्राण्यासोबत जादूचा प्रयोग केल्याचा. त्यांनी मनेकाला बजावले, यापुढे तू सिंहासोबतचा प्रयोग करणार नाहीस. सिंह आता मोठा झाला आहे. पण त्यांच्या तिन्ही मुलींनी आणि पत्नीनेही पी. सी. सरकार यांच्याकडून वचन घेतले, तुम्हीही आता त्या सिंहासोबत रिस्क घेऊ नये. त्यानंतर त्यांनी तो सिंहाचा जादूचा प्रयोग बंद केला.

मनेका सरकारला तिच्या राजेशाही ड्रेसबद्दल विचारले, हा राजासारखा ड्रेस जादूगारांनी घालण्याची परंपरा केव्हा सुरू झाली? त्यावर तिने जे उत्तर दिले ते मोठे रंजक आहे.

जोधपूरचे राजपुत्र हरबंत सिंग हे तिच्या आजोबांचे म्हणजे पी. सी. सरकार सीनियर यांचे खास मित्र होते. राजपुत्र हरबंत सिंग हे कलासक्त होते. अतिशय देखणे, उंचपुरे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कला, चित्रकला, संगीत अशा विविध गोष्टींमध्ये रस होता.त्यांना जादूचे प्रयोग करण्याची विशेष आवड होती. लंडनला गेले की, ते राजपुत्र तिकडून जादूच्या प्रयोगांचे विविध साहित्य घेऊन येत व ते शिकवण्यासाठी ते पी. सी. सरकार सीनियर यांना बोलावत. त्यातून दोघांची मैत्री झाली. एक दिवस राजपुत्र हरबंत सिंग यांनी फक्त आपल्या राजघराण्यातीलच लोकांना जादूचे प्रयोग दाखविण्याचे ठरविले. सहकारी म्हणून त्यांनी पी. सी. सरकार सीनियर यांना बोलावले होते. पण राजपुत्र हरबंत सिंग यांनी फक्त पंधरा-वीस मिनिटेच जादूचे प्रयोग दाखवले.

पुढचे प्रयोग पी. सी. सरकार सीनियर यांनी दाखवावेत असे राजपुत्र हरबंत सिंग यांनी सांगितले. पण शर्ट-पॅण्ट या साध्या कपड्यातील पी. सी. सरकार सीनियर यांना स्वीकारायला राजघराण्यातील लोक तयार होईनात. म्हणून हरबंत सिंग यांनी पी. सी. सरकार सीनियर यांना एका रूममध्ये नेऊन आपला राजाचा ड्रेस दिला. राजेशाही पगडी दिली आणि त्या राजेशाही वेशात पी.सी. सरकार सीनियर यांनी जोधपूर राजघराण्यातील व्यक्तींना जादूचे प्रयोग दाखवून थक्क केले. पी.सी. सरकार यांच्या शाही पगडीवर जो तुरा दिसतो, तो जोधपूर राजघराण्याने दिलेला आहे. तो त्यांच्या पुढच्या पिढीने आजही जपून ठेवला आहे. त्याच वेळी पी.सी. सरकार यांचे व्यंगचित्रकार मित्र कुका त्यांना भेटले व म्हणाले, ‘‘तुम्ही महाराजांच्या वेशात जादूचे प्रयोग चालू केलेत त्यावेळी मी चित्रकार असल्यामुळे मीही एक जादूचे प्रयोग झाल्यावर प्रेक्षकांना लवून दाद देणारा तुमच्यासारखा महाराजा रेखाटला आहे, तुमच्यासारखाच मिशीवाला!’’ हाच तो एअर इंडियाचा जगप्रसिद्ध महाराजा. मनेका सरकारने आणखी एक रंजक गोष्ट सांगितली. मनेका सरकारच्या आजोबांचे प्रयोग जपानला खूप गाजले. त्यांना जपानला जाण्याची प्रेरणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. फक्त एवढेच सांगितले की, जपानच्या दौर्‍यातला फायद्याचा काही हिस्सा रासबिहारी बोस यांना देशसेवेसाठी द्या. मनेका सरकारने पुढे सांगितले.

पूर्वी जादूकडे अंधश्रद्धा म्हणून बघितले जात असे. आजची जादू हे उद्याचं विज्ञान असतं. तिचे पूर्वज जादूचे प्रयोग करीत, पण आजूबाजूच्या लोकांना ती काळी जादू वाटत असे. त्यामुळे तिचे एक पूर्वज आत्माराम यांना लोकांनी मारलं. मनेका सरकार एमबीएसारखी पदवी घेऊन अमेरिकेतून परतल्या व ज्या व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी होती तो व्यवसाय त्यांनी निवडला. त्यासाठी नवर्‍याची कितपत साथ मिळते, प्रपंचातून त्या कितपत, कशा वेळ काढतात हे विचारताच त्यांनी एक गमतीदार बंगाली म्हण सांगितली. त्या म्हणीचा अर्थ असा आहे- ‘जी गृहिणी दिवसभर जेवण, घरकाम करते, तिला केस विंचरायलाही वेळ काढावाच लागतो.’ आपल्याकडे ‘आवड असेल तर सवड होते’ अशी म्हण आहे. जादूचे प्रयोग करता करता अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम होते. ही जादू नसून हाथसफाई आहे हे त्या आवर्जून सांगतात. दुर्गामाता म्हटले की, बंगाल आठवतो. मनेका हे दुर्गामातेच्या आईचे नाव आहे. या संस्कृत शब्दाचा अर्थ मंत्रतंत्र असा होतो. रामायणामध्ये ‘विद्युत जिव्हा’ नावाच्या महिला जादूगाराचा उल्लेख आहे. विक्रमादित्य, भोज राजांची नातेवाईक भानुमती हीही जादूचे प्रयोग करीत असे. त्यावरूनच ‘भानामती’ हा शब्द आला.

महिला जादूगारांची अशी आपल्या देशात प्राचीन परंपरा आहे मनेका सरकार हे आणखी एक नाव. मनेका सरकार यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे काम करणार्‍याना प्रत्येकाला फ्लॅट दिला आहे. ही सामाजिक जाण व त्यांच्या वृद्धपणाची सोय केली आहे. मनेका आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाशी बोलताना एक गोष्ट जाणवते की, त्यांच्या महाराजासारख्या वेशामागे एक राजाचं मन आहे आणि या जादूगाराच्या ड्रेसच्या आत एक सुंदरसा माणूस लपलेला आहे!