अरुण दाते यांच्यामुळे मला निवेदनाचे मर्म कळले- मंगला खाडिलकर

106
सौजन्य- फेसबुक

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे रविवार ६ मे रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी भावगीत गायनातला शुक्रतारा निखळल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ निवेदिका आणि निरुपणकार मंगला खाडिलकर यांनीही आपल्या भावना ‘सामना ऑनलाईन’कडे व्यक्त केल्या.

”माझ्या निवेदनाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी शुक्रतारा आणि स्वरगंगा हे दोन कार्यक्रम मी अरुण दाते यांच्यासोबत केले. त्यांच्यासोबत काम करताना मला निवेदनाचं मर्म काय हे कळू लागलं. निवेदन हे काव्यात्म असावं पण नाटकी असू नये, हे मला त्यांनीच शिकवलं. आम्ही त्यांना अरुभैय्या म्हणायचो. अरुभैय्या अतिशय शिस्तप्रिय, घरंदाज व्यक्तिमत्वाचे गायक होते. संगीतकाराने संगीतबद्ध केलेलं गीत पहिल्या रेकॉर्डिंगपासून, जेव्हा जेव्हा गायलं जाईल, त्यावेळी जसंच्या तसं गाणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते इतके ताकदीचे गायक होते की त्या गाण्यांमध्ये स्वतःच्या जागा घेऊ शकत होते. पण त्यांनी तसं कधीच केलं नाही, अशा शब्दांत खाडिलकर यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

”त्यांनी गाण्याची पहिली ओळ म्हटली की सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत असे. अतिशय मार्दवभरल्या आवाजात गायलेली त्यांची गाणी ही भावगीतांच्या विश्वात त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे लोकप्रिय झाली. कोल्हापूर इथल्या त्यांच्या एका कार्यक्रमाला प्रेक्षकांची इतकी तुडुंब गर्दी झाली होती की काही प्रेक्षक अगदी झाडांवर बसून गाणी ऐकत होते. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं म्हणजे काय हे त्यांच्या गायनातून मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. त्यांच्या गाण्यामुळे शब्द, सूर, ताल, लय यांची ताकद काय असते, हेही मी जवळून पाहिलं, अनुभवलं आहे,” हे सांगतानाच अरुभैय्यांच्या जाण्याने भावगीत गायनाच्या आकाशातला शुक्रतारा निखळल्याची भावना मनात दाटून येत असल्याचं मनोगत मंगला खाडिलकर यांनी व्यक्त केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या