घरावर कोसळले आंब्याचे झाड, दोन लाख रूपयांचे नुकसान

सामना प्रतिनिधी । प्रतिनिधी

मालवण कोळंब लाडवाडी येथील सुवर्णा सदानंद लाड यांच्या घरावर रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आंबा कलम कोसळल्याने घराचे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. झाड पडताना झालेल्या आवाजामुळे घरातील सगळी माणसे भितीने बाहेर पडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र संपूर्ण घराचे कौलारू छप्पर व भिंती कोसळून नुकसान झाले. सरपंच प्रतिमा भोजने यांनी घराची पाहणी करून महसूल विभागाकडून मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सुवर्णा लाड यांच्या घराशेजारी असलेल्या आंब्याचे झाड रात्री सुटलेल्या वार्‍यामुळे तुटून घरावर कोसळले. यावेळी घरात सदानंद लाड, संदेश लाड, श्रेया लाड, चिन्मयी उपस्थित होते. झाड कोसळण्याच्या आवाजाने त्यांनी घर सोडल्याने फक्त घराचेच नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांनी घरावर झाड पडल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी धाव घेत घरावरील झाड तोडून बाजूला केले होते. लाड कुटुंबियांनी सध्या शेजारील घरात आसरा घेतलेला आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर लाड कुटुंबियांवर ओढावलेल्या आपत्तीमुळे मोठा आघात झाला आहे.