हिंदुस्थानला दुषणे देणाऱ्या अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी करा!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँगेसचे ‘निलंबित’ ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांना त्यांचे पाकिस्तानमधील वक्तव्य भोवणार असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षासह स्वपक्षातील नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. कराचीला जाऊन हिंदुस्थानला दुषणे देत पुन्हा एकदा पाकिस्तानचे गोडवे गायल्याने काँग्रेस नेते हनुमंत राव यांनी त्यांच्यावर आसूड ओढले आहेत.

‘मणिशंकर अय्यर यांनी अशा मुद्द्यांवर आपले तोंड बंद ठेवले पाहिजे. वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेसमधून याआधीच त्यांना निलंबित करण्यात आल्याने त्यांनी आता शांत बसावे. त्यांच्या अशाच वाचाळगिरीचा विरोधी पक्ष फायदा उठवू शकतो. अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहिणार आहे, असे एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राव म्हणाले.

मणिशंकर अय्यर यांनी सोमवारी कराचीला जाऊन हिंदुस्थानला दुषणे देत पाकिस्तानचे गोडवे गायले. ‘हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील वादावर संवाद हाच तोडगा आहे’ हे धोरण पाकिस्तानने स्वींकारले याचा आपल्याला अभिमान वाटतो, पण तेच धोरण हिंदुस्थान स्वीकारत नाही याचे दुःखही वाटते असे उद्गार अय्यर यांनी काढले. ते कराची येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यावर तिथे उपस्थित पाकडय़ा श्रोत्यांनी टाळय़ांचा जोरदार कडकडाट केला.

दरम्यान, रविवारी आणि सोमवारी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानच्या दोन लष्करी तळांवर लागोपाठ हल्ले केले आहेत. त्याबद्दल देशभरात संतापाची लाट उसळली असताना मणिशंकर यांनी पाकिस्तानवर स्तुतिसुमनांची बरसात केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरूनही त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. अय्यर यांचे पाकिस्तान प्रेम उफाळून येत असल्यास त्यांना पुन्हा हिंदुस्थानमध्ये येऊ देऊ नका अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नीच म्हटले म्हणून काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित केले आहे. पंतप्रधानांवर टीका करताना मणिशंकर यांनी ‘नीच’ आणि ‘असभ्य’ हे शब्द वापरले होते.