‘मणिकर्णिका’ चित्रपटाच्या निर्मात्याला अर्धांगवायूचा झटका

सामना ऑनलाईन । मुंबई

कंगना रनौत हिचा आगामी महत्त्वकांक्षी चित्रपट ‘मणिकर्णिका’चे निर्माते कमल जैन यांना अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यांच्यावर कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असल्याचे बोलले जाते. चित्रपट प्रदर्शनाच्या अवघ्या पाच दिवस आधी ही घटना घडल्याने चित्रपटाची संपूर्ण टीम हादरली आहे.

कमल जैन हे झी स्टुडिओस व कैरोस कोनटेंट स्टुडिओस सोबत मणिकर्णिका या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. कमल जैन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात त्यांनी मणिकर्णिकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हॉस्पिटमध्ये अॅडमिट होण्याची ही योग्य वेळ नाही. माझी संपूर्ण टीम,कंगनास, प्रसूनजी, विजेयंद्रजी, शंकर अहसान, अंकिता, मिश्टी आणि इतर सर्वांना मी खूप मिस करतोय. मी लवकरच परत येईन. तो पर्यंत मी मनाने तुमच्या सोबत राहिन. आपण गेली दोन वर्षे या मणिकर्णिकाला ब्लॉकबस्टर चित्रपट बनविण्यासाठी प्रचंड महेनत घेतली आहे. आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे.’ असे जैन यांनी ट्विट केले आहे.