माणिकताई भिडे

शिल्पा सुर्वे

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या इतिहासात जयपूर अत्रौली हे  अत्यंत प्रतिष्ठsचे घराणे समजले जाते. उस्ताद अल्लादियाँ खाँ हे घराण्याचे आद्यपुरुष. त्यांचा वारसा भास्करबुवा बखले, भुर्जी खाँ, केसरबाई केरकर, वामनराव सडोलीकर, मोगूबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर यांनी समर्थपणे चालवला. याच घराण्याच्या ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना मंगळवारी राज्य शासनाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला. गानसरस्वती किशोरी आमोणकर या जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका होत्या. त्यांच्याकडेच १९६४ ते १९८० पर्यंत माणिक यांनी संगीताचे शिक्षण घेतले. माणिकताई खरे तर मोगूबाई कुर्डीकरांकडे जयपूर गायकी शिकण्यासाठी गेल्या होत्या. पण माई घरात नव्हत्या. किशोरी आमोणकर घरात होत्या. त्यांनी माणिक यांना गायला सांगितले. त्यांनी बिहाग रागातील चीज ऐकवली. त्या क्षणापासून किशोरीताईंनी माणिकला शिष्या करून घेतले. किशोरीताईंचे गाणे माणिकताई मन लावून ऐकायच्या, त्यांचे चिंतन मनन करायच्या. पुढे पुढे तर माणिकताई किशोरीताईंना मैफलीत तंबोऱयावर साथसंगत करू लागल्या. मैफल कशी रंगवायची, गाणं कसं फुलवायचं याचे शिक्षण माणिक यांना मिळाले. त्यांची संगीत बैठक पक्की झाली. माणिकताई मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचे वडील श्री. रा. पोतनीस हे वकील होते. मात्र ते संगीतप्रेमी होते. त्याकाळी अल्लाउद्दीन आणि त्यांचे पुत्र भुर्जी खाँ कोल्हापुरात होते. भुर्जी खाँ यांच्याकडे मधुकरराव सडोलीकर गाणे शिकत होते. त्याच दरम्यान अब्दुल करीम खाँदेखील मिरजेहून कोल्हापुरात आले. हे सगळे दिग्गज माणिक यांच्या वडिलांच्या मित्राकडे मुक्कामाला असत. माणिकताई संगीताच्या ओढीने तिथे जायच्या. मधुकरराव सडोलीकरांनी त्यांना शास्त्रीय संगीत शिकवायला सुरुवात केली. त्यावेळी त्या माणिक वर्मा यांची निमशास्त्र्ााrय गीतं गात होत्या. माणिक वर्मा यांचा सहवासही माणिकताईंना काही काळ लाभला.  त्यानंतर गोविंद भिडे यांच्याशी विवाह करून माणिकताई मुंबईला आल्या. सासरी संगीत शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले. माणिकताई आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त गायिका बनल्या. देशविदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांच्या गाण्यांच्या सीडीही निघाल्या. माणिकताई भिडे या जितक्या श्रेष्ठ आहेत, तेवढय़ाच गुरू म्हणून अद्वितीय आहेत. त्यांची कन्या अश्विनी भिडे -देशपांडे त्यांच्याच तालमीत तयार होऊन घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.  ‘माई माझ्या शाळेत जाणाऱया मुलीला गाणं शिकवायला कुणाकडे पाठवू,’असे माणिकताईंनी गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना विचारले होते. त्यावेळी मोगूबाईंनीच त्यांना सल्ला दिला होता की, ‘तूच का शिकवत नाहीस, तुला चांगले जमेल.’ माईंच्या सांगण्यावरून माणिक यांनी अश्विनीला शिकवायला सुरुवात केली. माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतिका वर्दे या माणिकताईंच्या इतरही शिष्यांनी नाव कमावले आहे. या सर्व शिष्यांची माणिकताईंवर उदंड भक्ती आणि प्रेम आहे. माणिकताई सर्व शिष्यांना एकसारखे शिकवत नसत. प्रत्येकाचे सामर्थ्य त्या जाणून घेत आणि त्यानुसार त्याला मार्गदर्शक करीत. सुरावरून सुराकडे जायचे कसे आणि परतायचे कसे, हे त्या उत्तमरीत्या सांगत. स्वतŠची संगीताची नजर शिष्यांना देत. आवाज तरंगण्याचा, गाणे तरंगण्याचा मंत्र देत. शिष्यांच्या गळ्यातून चांगली जागा निघावी यासाठी त्या न थकता स्वतः मेहनत घेत. शिष्य घडवण्याची परंपराच त्यांनी पुढे नेली. आता पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने जाहीर झालेल्या सर्वोच्च पुरस्काराने माणिकताईंना गौरविण्यात आले आहे. उशिरा का होईना सरकार दरबारी या ‘माणिक’ रत्नाची दखल घेतली गेली. हेही नसे थोडके!