मुद्दा : ब्लू बॉटल जेली फिशचा धोका

>>मनोहर विश्वासराव<<

जेली फिश सर्वांनाच माहीत आहे, पण समुद्राच्या पाण्यावर हेलखावे खाणारे छत्रीच्या आकाराचे जेली फिश जितके सुंदर दिसतात, तितकेच विषारीसुद्धा असतात. जेली फिशच्या काही प्रजाती अशा आहेत की, त्याच्या दंशाने माणूस जखमी होऊ शकतो. त्यात ब्लू बॉटल जेली फिश हे अत्यंत विषारी असतात. गेल्या काही वर्षांमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी जेली फिशच्या दंशामुळे गणेशभक्त जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, पण नुकत्याच मुंबईच्या सागरी परिसंस्थेचा अभ्यास करणाऱ्या मरीन लाईफ ऑफ मुंबई या मोहिमेतील अभ्यासकांना गिरगाव आणि जुहू किनाऱ्यावर विषारी ब्लू बॉटल जेली फिश आढळून आले आहेत. विषारी जेली फिशमुळे सध्या मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ब्लू बॉटल जेली फिशचे शरीर दोन इंच आकाराचे, निळ्या रंगाचे, फुग्यासारखे असते व सात इंच लांबीचे दोरीसारखे पाय असतात. पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीकडे प्रचंड वेगाने वारे वाहत असल्याने वजनाने हलके असलेले जेली फिश वाऱ्यासोबत हेलकावे खात समुद्रकिनाऱ्यावर पोहोचतात. बऱ्याचदा विषारी जेली फिशबद्दल माहिती नसल्यामुळे लोकही बिनधास्तपणे समुद्रावर फेरफटका मारत असतात, पण ब्लू बॉटल जेली फिशच्या दंशाने मानवी शरीरात विष पसरत असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. तसेच त्याच्या दंशाने माणसाला असह्य वेदना होऊन लाल रंगाचे व्रण मानवी शरीरावर उठतात. तेव्हा समुद्रात उतरू नये किंवा समुद्रावर अनवाणी फिरू नये असे आवाहन अभ्यासकांनी केले आहे. समुद्राच्या उसळत्या लाटांची मजा घेण्यासाठी काही जण समुद्राच्या पाण्यात उतरतात, पण क्षणभराची मजा ही जीवघेणी सजा ठरू शकते याकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. ब्लू बॉटलने दंश केल्यास त्यावर प्राथमिक उपचार म्हणून सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूटने परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शक्यतो पावसाळ्यात समुद्रात जाऊ नये. जर नकळत जेली फिशचा पायांना स्पर्श झाला तर समुद्राच्या पाण्याने पाय धुऊन काढा. तसेच किनाऱ्यावर वाहून आल्यानंतर या जेली फिशच्या दोरीसारख्या पायांमध्ये काही प्रमाणात विष असल्याने नागरिकांनी अनवाणी किनाऱ्यावर फिरू नये. जेली फिशचा दंश झाला आहे, तो भाग चोळू नका. त्यामुळे विष अधिक पसरू शकते. जेली फिशच्या दंशाने असह्य वेदना होत असल्यामुळे गरम पाण्याचा वापर करावा, पण दंशाची तीव्रता कमी करण्यासाठी अल्कोहोल अथवा स्पिरिटचा उपयोग करू नये. तसेच डॉक्टरांकडेही जावे असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे, पण गणेश विसर्जनाच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांना विषारी जेली फिशचा सर्वाधिक धोका असतो. तेव्हा विषारी जेली फिशचा धोका लक्षात घेता पालिका प्रशासनाने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रकिनाऱ्यावर विशेष उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर जेली फिशपासून सावधान करण्यासाठी सूचना फलक लावण्यात यावेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विषारी जेली फिशबद्दल लोकांना जागरुक केले पाहिजे.