मंत्रालय बनला सुसाईड पॉइंट

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याचा कारभार जेथून हाकला जातो ते मंत्रालय सुसाईड पॉइंटच बनले आहे. येथे कुणी आत्महत्येचा प्रयत्न करतो तर कुणी आत्मघात करतो. बातम्या धडकतच आहेत. सरकार विरोधातील संतापाचा लाव्हा उसळत ठेवत कुणी शेतकरी कनवटीला विषाची बाटली घेऊन येतो तर कुणी मंत्रालयाच्या सज्जात उभा राहून न्यायाची मागणी करतो. गेल्या पंधरा दिवसांत चौघांनी असा टोकाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटवर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न एका तरुणाने केल्याची घटना बुधवारी घडली असतानाच आज चेंबूरमधील हर्षल रावते याने तुरुंगवासाची शिक्षा कमी करीत नाही म्हणून नैराश्य आल्याने थेट पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. यामुळे मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे.

सायंकाळी पाच वाजल्यानंतर मंत्रालयीन कर्मचाऱयांची बाहेर पडण्याची लगबग सुरू असतानाच सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी मंत्रालयात अचानक जोरदार आवाज झाला. पिवळय़ा टी शर्टवरील एक तरुण मंत्रालयाच्या त्रिमूर्ती पटांगणात मरणासन्न अवस्थेत पडला होता. क्षणभर काय घडलेय हेच कुणाला कळत नव्हते. कोणीतरी उडी मारली की काय पडले असा गोंधळ सुरू असतानाच मंत्रालयातील पोलिसांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. या तरुणाला तत्काळ अॅम्ब्युलन्समधून सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले, मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला तर मंत्रालयात शिक्षणमंत्री विनोद तावडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. हर्षलकडे मिळालेल्या आयकार्डवरून तो राज्य विधी सेवा प्राधिकरणात पॅरालिगल स्वयंसेवक म्हणून कार्यरत होता असे समजते.

हर्षलच्या खिशात ५०० च्या नोटा
हर्षल हा विधी व गृह विभागात शिक्षेत सूट मिळावी यासाठी केलेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी आला होता, मात्र त्याने जेव्हा आत्महत्या केली त्यावेळी त्याच्या पाकिटात ५०० रुपयांच्या नोटांचे पुडके सापडले. त्याचप्रमाणे त्याचे आधार कार्ड, पॅनकार्डही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घरी फोन करण्याचा प्रयत्न केला असता तो गुन्हेगार असल्याचे कळले आणि तपासाची सूत्रे पुढे सरकली. पोलिसांना प्रतिसाद मिळत नसल्याने अजित पवार, जयंत पाटील यांनीही त्याच्याच मोबाईलवरून फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
खुनाचा गुन्हा महिला वा बालकांविरुद्ध असेल तर जन्मठेपेच्या शिक्षेत २६ वर्षांनंतर माफी देता येते. त्यामुळे या प्रकरणात आणखी ५ वर्षे त्याला कायद्याने माफी देता येणे शक्य नव्हते, असे गृहविभागाने सांगितले.

– मुंबईत मेहुणीची हत्या केल्याप्रकरणी हर्षल रावते यास १४ वर्षे कारावासाची शिक्षा झाली होती. १० वर्षे बंदिस्त कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या हर्षलचे तुरुंगातील वर्तन चांगले होते. त्याची दखल घेऊन हर्षलची पैठणच्या खुल्या कारागृहात रवानगी करण्यात आली.
– पैठणमध्ये तीन वर्षांपूर्वी आलेल्या हर्षलने पॅरोलसाठी अर्ज केला होता. १० जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीसाठी त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
– सुट्टी संपवून आजच त्याने पैठणमध्ये येणे अपेक्षित होते, मात्र त्याच्या आत्महत्येचीच बातमी तुरुंग प्रशासनाला कळली.
– हर्षलने आपली शिक्षा कमी करण्यात यावी असा अर्ज केला होता, मात्र तो अर्ज मान्य होत नसल्याने त्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.

मंत्रालयातील गेल्या चार महिन्यातील आत्महत्येच्या घटना :

१. ज्ञानेश्वर साळवे, तुळजापूर ( १० नोव्हेंबर २०१७ ) – हा तरुण शेतकरी आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील छतावर चढला होता.

२. धर्मा पाटील, धुळे ( २२ जानेवारी २०१८) – या ८४ वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेरच विष प्राशन करून आत्महत्या केली.

३. मारुती धावरे, सोलापूर ( २ फेब्रुवारी २०१८) – हा २८ वर्षीय शेतकरी आत्महत्या करण्यासाठी कीटकनाशक घेऊन मंत्रालयात गेला होता, परंतु त्याचा प्रयत्न फसला.

४ अविनाश शेटे, नगर (७ फेब्रुवारी २०१८) – या तरुणाने मंत्रालयाबाहेर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.