मंत्रालय आजपासून पाच दिवस बंद, सरकारी कामकाजाला टाळे लागले

3

सामना प्रतिनिधी । मुंबई

दिवाळीनिमित्त शाळा-कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. पण दिवाळीनिमित्त मंत्रालय सलग पाच दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱयांची खऱया अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. मात्र या सलग सुट्टय़ांमुळे मंत्रालयात कामानिमित्त येणाऱया सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत.

दिवाळीनिमित्त बुधवारपासून शुक्रवारपर्यंत मंत्रालयाला सुट्टी आहे. त्याला जोडून दुसरा शनिवार व नंतर रविवार अशा सलग सुट्टय़ा आल्या आहेत. पण मंत्रालयात सोमवारपासूनच सुट्टय़ांचा माहोल सुरू झाला होता. आजही अधिकारी व कर्मचारी सुट्टीच्या मूडमध्ये होते. मंत्रालयात फारसे कामकाज झाले नाही. अनेक कार्यालयांत शुकशुकाट होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून बहुतांश मंत्रीही मुंबईच्या बाहेर आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी होती. पण दिवाळीनिमित्त बहुतांश मंत्री त्यांच्या मतदारसंघात रवाना झाल्यामुळे मंत्रिमंडळाची बैठकही झाली नाही. आता मंत्रिमंडळाची बैठक पुढील आठवडय़ात होईल. या सुट्टय़ांमुळे मात्र या आठवडय़ात राज्य मंत्रिमंडळात कोणताही महत्त्वाचा निर्णय होणार नाही. राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. भाजप सरकार राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱयांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करील या आशेने शेतकरी वाट बघत आहेत. पण सलग सुट्टय़ांमुळे सर्वसामान्यांबरोबर शेतकऱयांचीही मोठी निराशा झाली आहे.