जीवघेणे किटकनाशक, बळींच्या संख्येत वाढ

सामना ऑनलाईन । नागपूर

यवतमाळ जिल्ह्यात २२ शेतक-यांचा फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला असून ७५० हून अधिक शेतकरी अत्यवस्थ आहे. बुलडाणा जिल्ह्यात विषबाधेने ११ जणांचा तर अकोला सामान्य रुग्णालयात ८ जणांचा मृत्यू झाला.

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) चार रुग्णांचा मृत्यू कीटनाशकांमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील दोन व्यक्ती नागपूर, तर दोन भंडारा जिल्ह्यातील असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गुरुवारी (५ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, मेडिकलमध्ये २३ लोकांचा मृत्यू कीटकनाशकांमुळे झाला आहे. यात चार मृत्यू फवारणीमुळे झाल्याची नोंद आहे. यापैकी दोन मृत्यू नागपूर जिल्ह्यातील (रामेश्‍वर गिरी, मवाळी, ता. पारशिवनी, प्रभाकर मिसाळ, धामणगाव, ता. भिवापूर ) तर दोन मृत्यू भंडारा जिल्ह्यातील (रमेश प्रधान व शुभांगी वंगे) आहेत. १९ मृत्यूची कारणे विविध असून यात १३ मृत्यू जिल्ह्यातील आहेत. तर उर्वरित ६ मृत्यू विविध जिल्ह्यातील आहे. कीटनाशकांच्या नमुन्याची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल

लक्षात ठेवा

शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना संरक्षक कपड्यांचा वापर करावा

फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावे

फवारणी करताना कीटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा श्वास घेणे टाळावे

फवारणी मिश्रण हाताने न ढवळता लांब काठीचा वापर करावा

फवारणी करताना तंबाखू खाणे अथवा धूम्रपान करणे टाळावे

उपाशीपोटी फवारणी करू नये़ कीटकनाशक अंगावर पडू देऊ नये

फवारणीचे काम दरदिवशी आठ तासांपेक्षा जास्त वेळ करू नये

कीटनाशकांच्या डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे लक्ष द्यावे.

लाल रंगाचे चिन्ह असलेले कीटकनाशक सर्वाधिक विषारी असते