जीवघेणा परतीचा पाऊस, वीज कोसळून १४ ठार!

सामना प्रतिनिधी । नगर, बीड, महाड

मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये आज (शनिवारी) परतीच्या पावसाने कहर केला. मुसळधार पाऊस झाला आणि विजा कोसळून राज्याच्या विविध भागांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. एकट्या बीड जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू झाला. महाडमध्ये दोन आणि नगरमध्ये तीनजणांचा मृत्यू झाला.

बीड
परतीच्या पावसाने घातलेले धुमशान आणि विजांच्या तांडवाने आज मराठवाड्य़ाचा थरकाप उडाला. कडकडणाऱ्या विजांनी नऊ बळी घेतले. त्यापैकी सहा बीड तर दोन संभाजीनगर आणि एक जालना जिल्ह्य़ातील आहे. धारूर तालुक्यातील चारदरी येथील घागरवाडा माळावर पाऊस पडत असल्याने आश्रयासाठी झाडाखाली बसलेल्या दहा जणांवर वीज पडली. यात आसाराम आघाव, उषा आघाव, दीपाली घोळवे, शिवशाला मुंडे, वैशाली मुंडे हे ठार झाले. सुमन तिडके, रुक्मीण घोळवे, कुसाबाई घोळवे, सीताबाई घोळवे, सुरेखा आघाव हे पाच जखमी झाले. माजलगावातील लोणगाव शिवारात राधाबाई कोळसे, पैठण तालुक्यात ढाकेफळ येथे रामेश्वर शेरे कन्नड तालुक्यातील देवळाणा येथे संदीप कचरू सोनवणे जालना जिल्ह्य़ात बदनापूर तालुक्यात धोपटेश्वर येथे चंद्रभागा विष्णू दाभाडे हे वीज कोसळून मृत्यू पावले.

नगर
नगर जिह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. यावेळी जिह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. देविदास मारुती जाधव (४०, रा. आंबड, ता. अकोले) आणि लता संजय पवार (३२, रा. संवत्सर, ता. कोपरगाव), सचिन प्रेमराज निंबोरे (३५, रा. नागापूर, ता. कर्जत) अशी वीज पडून ठार झालेल्यांची नावे आहेत. आंबडमधील देविदास जाधव हे जनावरांचा चारा झाकण्यासाठी घराबाहेर गेले. त्यावेळी वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर लता पवार या शेतात कांदा लागवड करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.

महाड
गेले दोन दिवस महाडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. आज देखील सायंकाळी अशाचप्रकारे वीज आणि पाऊस पडत असताना महाड-किन्हेरे मार्गावर कुर्ले गावानजीक झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांकर वीज कोसळून हे दोघेही जागीच ठार झाले आहेत. प्रफुल्ल उमेश कदम (४०, रा. देऊळकोड, आंबाकडे) आणि दिलीप शंकर साळकी (३५, रा. कुर्ले) अशी या मृतांची नावे आहेत.